नवी मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क वाशीतील सेक्टर १४ एम जी कॉम्लेक्स मधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. १०, ११, १२ व्या मजल्यावर आग लागली होती.दहाव्या मजल्यावर घरात एका आजीचा मृत्यू तर १२ व्या मजल्यावर घरात आई,वडील आणि ६ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर वाशी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे.
या दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १२.४० च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि ११ व्या आणि १२ व्या मजल्याला आगीने कवेत घेतले. या आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय ६), कमला हिरल जैन (वय ८४), सुंदर बालकृष्णन (वय ४४) आणि पुजा
राजन (वय ३९) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
-कामोठेमध्येही भीषण आगीची घटना
नवी मुंबईतील कामोठे येथील सेक्टर ३६ मध्ये आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीतही आग लागली होती.आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. आंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. रूम क्रमांक ३०१ मध्ये ही आग लागली होती. तिसऱ्या मजल्यावरील घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाला. सोसायटीतील नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग वेगाने पसरली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील तीन सदस्य बाहेर पडले.मात्र,आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडले होते. या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.
