झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील जांभुळवाडी येथील भारतीय जनता पक्षाचे नेते, साकूर पठारभागाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे बुवाजी खेमनर ( वय ४९ ) याचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने दुदैवी निधन झालं.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.नुकतेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ.शालिनी विखे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.निलम खताळ यांनी दिवंगत बुवाजी खेमनर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली.
यावेळी सौ. विखे व खताळ यांनी दिवंगत.बुवाजी खेमनर यांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सौ.शालिनी विखे व सौ.निलम खताळ यांनी दिवंगत बुवाजी खेमनर यांच्या पत्नी सुनिता यांना धीर दिला.तसेच मुलांसह कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी शालिनीताई विखे व निलम खताळ अक्षरशः भावूक झाले.
कृतीच्या रिंगणात बेधडक उतरणारा लोकनेता.
दिवंगत बुवाजी खेमनर यांचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या घराण्याशी घनिष्ठ संबंध होते. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून दिवंगत बुवाजी खेमनर यांची ओळख होती. आमदार अमोल खताळ यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते.त्यांच्या निधनामुळे पठार भागात एक पोकळी निर्माण झाली आहे. तसेच गावागावांत शोककळा पसरली आहे. एक नेते मात्र नाही, तर लोकांच्या मनातील विश्वासाचं प्रतीक हरपलं आहे अशी भावना जनसामान्य व्यक्त करीत आहेत.
दिवंगत बुवाजी खेमनर यांचा पेहराव नेहमी पँट आणि नीट इस्त्री केलेला पांढरा शर्ट परिधान करूनच दिसायचे.त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा आणि ठामपणा दोन्ही एकत्र दिसत होता. आक्रमक भाषणशैली, स्पष्ट वक्तेपणा आणि जमिनीवर उतरून केलेलं समाजकारण यामुळेच ते साकूर पठार भागातील लोकांच्या मनात “बुवाजी” म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून गेले.
धार्मिक,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटवली.जनतेच्या अडचणी स्वतःच्या म्हणून सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने साकूर पठार भागातील राजकीय वातावरणात शून्यता निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य,त्यांची भाषणे आणि जनतेवरील प्रेम आता केवळ आठवणीत उरले आहे. मात्र साकूर पठार भागाचा आवाज आज कायमचा थांबला आहे.
