कोल्हार प्नतिनिधी राहाता तालुक्यातील कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकताच 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात पार पडला.
मा.राष्ट्रपती दिवंगत.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.या निर्णयास अनुसरुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे अधीक्षक भाऊसाहेब गटकळ यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरीभाऊ आहेर यांनी विद्यार्थ्यां ना 'वाचनाचे महत्व' या विषयावर मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासपूरक उपक्रमात सहभागी होऊन वाचन संस्कृती वाढविण्यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले.
प्रसंगी ग्रंथालय विभागासाठी काही पुस्तके भेट म्हणून दिली.ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ. अनिल पवार यांनी इंटरनेटवर संशोधन साहित्याचा आढावा कसा घ्यावा' याविषयी विद्यार्थ्यां ना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तसेच सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र वडमारे यांनी केले. आभार प्रा. परमेश्वर विखे यांनी मानले.
यावेळी मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने मान्यवर लेखकांच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
