बुद्ध भूमीतील संस्कृती परंपरा आणि आपलेपणामुळे भारावले व्हिएतनामचे वऱ्हाडी
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव प्रेमाला जात,धर्म, भाषा,देश यांची सीमा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे!संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील तरुणाने थेट व्हिएतनामच्या तरुणीशी प्रेमविवाह करून ‘आंतरराष्ट्रीय रेशीमगाठ’ घट्ट बांधली आहे.हा अनोखा विवाह सोहळा भारतीय बौद्ध संस्कृती आणि व्हिएतनामी परंपरेचा संगम ठरला आहे.
हिवरगाव पावसा येथील आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक संदीप बाबाजी भालेराव आणि व्हिएतनामची कन्या शर्वरी शासकीय लेखापरीक्षक यांचा दिमाखदार अनोखा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा साजरा झाला.या मंगल परिणया मुळे दोन्ही देशांच्या संस्कृतींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले.
तालुक्यातील हिवरगाव पावसा बाबाजी हनुमंता भालेराव जि.अहिल्यानगर यांचे चिरंजीव संदीप याने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण केले.त्यानंतर संदीप याने मोक्ष योगा स्कूल समनापुर येथे योगा टीचर डिप्लोमा कोर्स पूर्ण केला.आणि दीड वर्ष गोवा येथील स्टुडिओमध्ये योगा टीचर म्हणून नोकरी केली.
सन २०१९ मध्ये संदीप थेट व्हिएतनामला योगा टीचर म्हणून स्टुडिओ मध्ये नोकरी करू लागला.तेथे नुयेन वन तुंग यांची मुलगी शर्वरी ही शासकीय लेखापरीक्षक यांच्या बरोबर ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि कुटुंबीयांच्या परवानगीने दोघांचा ११ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हिएतनाम येथे बौद्ध पद्धतीने विवाह झाला.भालेराव कुटुंबीयांच्या आग्रहानुसार भारतीय बौद्ध पद्धतीने नुसार संगमनेर येथे मंगल परिणय सोहळ्याचा प्रस्ताव ठेवला.
त्यांच्या व्हिएतनामच्या या सोयऱ्यांनी त्याला सहमती दिली.वधू शर्वरी व तिचे आई-वडील व इतर कुटुंबीयांसह व्हिएतनामचे वऱ्हाड संगमनेरला दाखल झाले.भारतीय बौद्ध संस्कृती व परंपरेनुसार वसंत लॉन्स संगमनेर येथे मंगल परिणय पार पडला.या अनोख्या आंतरराष्ट्रीय विवाह सोहळ्यामुळे भारतीय बौद्ध संस्कृती व व्हिएतनामच्या संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवता आला.
भारतीय परंपरा,विवाहविधी पाहून शर्वरी आणि तिचे कुटुंबीय भारावून गेले.भारतीय मिष्ठान्नाचे भोजन पाहुण्यांना भुरळ पाडणारे ठरले.लग्नापूर्वी पार पडलेल्या विधींनीही परदेशी पाहुणे हरखून गेले.शर्वरीच्या वडिलांनी संदीपला जावई म्हणून आनंदाने स्वीकारले आहे.त्याची हुशारी,बोलणे व कष्ट पाहून ते प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.
या मंगल परिणय सोहळ्यामुळे आंतरराष्ट्रीय रेशीमगाठ घट्ट बांधली आहे.बौद्ध विचार व तत्त्वांना महत्व देत असल्यामुळे भारत भूमी मध्ये विवाह संपन्न झाल्याचा मनस्वी आनंद आणि बुद्धभूमीचा जीवन साथी मिळाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे व्हिएतनामची कन्या नववधू शर्वरी हिने म्हटले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे, शिवसेना शिंदे मागासवर्गीय सेलचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,मुख्याद्यापक पोपट सोनवणे,भाजपा संगमनेर तालुका सरचिटणीस गणेश दवंगे माजी मुख्याध्यापक दशरथ भालेराव, कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,विशाल भालेराव,
शेनेश भालेराव,बच्चन भालेराव, सागर भालेराव यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार विवाह सोहळा पार पडला.
