२२ वर्षांनंतरही जपली 'मैत्रीची माणुसकी'!
आश्वी संजय गायकवाड २००३ साली दहावीची परीक्षा देऊन जीवनाच्या विविध टप्प्यांवर गेलेल्या खळी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन केवळ आठवणींचा मेळावा न ठरता, मैत्रीची जबाबदारी आणि सामाजिक ऋण जपणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरला.
तब्बल २२ वर्षांनी एकत्र आलेल्या या बॅचने शाळेचा आणि मैत्रीचा मान उंचावला आहे.
-दिवंगत मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात:
या गेट-टुगेदरमध्ये वर्गातील त्यांचे सहकारी मित्र दिवंगत राजेंद्र बबन कांगणे यांच्या अकाली निधनाची खंत व्यक्त करण्यात आली.सर्व मित्रांनी एकत्र येत दिवंगत कांगणे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा एकमुखाने संकल्प केला. त्यानुसार, त्यांनी एकत्रित केलेली रु. ११,०००/- इतकी भरीव आर्थिक मदत दिवंगत कांगणे यांच्या पत्नींस सुपूर्द करण्यात आली. हा उपक्रम म्हणजे मैत्रीची खरी जबाबदारी काय असते, याचा आदर्श वस्तुपाठ ठरला.
'जिथे घडलो' त्या शाळेला कृतज्ञतेची भेट:
"जिथे आपण घडलो, त्या शाळेस काहीतरी देणं हे आपलं ऋण आहे," या कृतज्ञतापूर्ण भावनेतून या माजी विद्यार्थ्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाला दोन संगणक संचांची भेट दिली. मैत्रीच्या या संमेलनातून शाळेचे उपकार आणि समाजाप्रती कर्तव्य ही तीन मूल्ये उजळून निघाली.
आठवणींची मैफल:
एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा, हस्य आणि जुन्या आठवणींची उधळण झाली. "पुढेही नेहमी एकत्र राहू!"असा निर्धार यावेळी सर्वांनी केला. ही भेट केवळ मेळावा नसून मैत्रीचे पुनरुज्जीवन असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी माजी मुख्याध्यापक नंदकुमार लबडे, तसेच शिक्षक श्री वर्पे श्री, पानसरे श्री वाबळे, श्री वाणी , श्री जोशी , एस.आर. लबडे, श्री घुगे , श्री दिवटे ,सौ लबडे , सौ.नाकाडे , सौ.दिघे या मान्यवर शिक्षकांची उपस्थिती लाभली. तसेच, राजेंद्र चकोर, सुरेश नागरे, सचिन आव्हाड आणि स्थानिक शाळा समितीचे सदस्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी धनेश घुगे, अनिल कांगणे, हरिदास जोशी, भागवत नागरे, अनिल तांबे, वैशाली तांबे-जाधव, रंजना वाघमारे आणि इतर सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन अनिल कांगणे यांनी केले, तर प्रास्ताविक वैशाली तांबे यांनी केले. व्यवस्थापनाची जबाबदारी धनेश घुगे यांनी सांभाळली, तर आभार प्रदर्शन गोरख लबडे यांनी केले.
केवळ फोटो काढून "पुढच्या वर्षी भेटूया" म्हणणाऱ्या मेळाव्यांपेक्षा खळी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाची २००३ बॅच मैत्रीला कृतीचा हात देऊन शाळेचा मान उंचावणारी ठरली आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
