आगारप्रमुखांच्या तोंडाला काळे फासणार – सर्वपक्षीय इशारा
श्रीरामपूर दिपक कदम कोरोना काळानंतर नुकतीच सुरू झालेली मुंबई एस.टी.बससेवा पुन्हा बंद करण्यात आल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.गेल्या आठ दिवसांपूर्वीच सुरू झालेली ही बससेवा "प्रवासी मिळत नसल्याचे" कारण देत पुन्हा थांबविण्यात आली आहे. या निर्णयाचा निषेध करत पाच दिवसांच्या आत बससेवा सुरू न केल्यास श्रीरामपूर एस.टी. आगारप्रमुखांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल,असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम शिखरे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली पाच वर्ष श्रीरामपूर– मुंबई बससेवा बंद होती.
सर्वपक्षीय आंदोलनानंतर ही सेवा फक्त पाचच दिवस सुरू करण्यात आली.परंतु, केवळ पाच दिवसांनंतर प्रवासी मिळत नसल्याचा हवाला देत बस बंद करण्यात आली,ज्यामुळे सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणीचे तसेच इतर प्रवाशांचे हाल होत आहेत.खाजगी ट्रॅव्हल्स वाले रोज तीन गाड्या श्रीरामपूर मुंबईला भरून जातात आणि आगार प्रमुख म्हणतात प्रवासी मिळत नाही त्यामुळे श्रीरामपूरकरांचा संशय बळावलाआहे की खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांसोबत आगारप्रमुखांचे काही हितसंबंध असावेत.
त्यांनी हे संबंध स्पष्ट करावेत का काही राज्यकर्त्यांनी राजकारण करून बस सेवा बंद करण्यास सांगितले हे जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
“जर पाच दिवसांच्या आत श्रीरामपूर–मुंबई एस.टी. बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली नाही, तर सर्वपक्षीय कार्यकर्ते आगारप्रमुखांच्या तोंडाला काळे फासून निषेध करतील.याची गंभीर नोंद प्रशासनाने घ्यावी.असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे बन्सीलाल फेरवानी राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड किशोर अभंग वंदना गायकवाड आदी उपस्थित होते.
