नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.रोटेशन पद्धतीने सोडत काढल्यास नाशिक महापालिकेचे १७ वे महापौरपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१४ ते २०१७ या कालावधीसाठी नाशिकचे महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. या कालावधीत मनसेचे माजी नगरसेवक अशोक मुर्तडक यांना संधी मिळाली. २०१७ ते २०१९ या कालावधीसाठी महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या रंजना
भानसी यांना महापौरपद मिळाले. २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी महापौरपद सर्वसाधारण अर्थात खुले झाल्याने भाजपचे नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. आता रोटेशन पद्धतीने सोडत काढल्यास नाशिकचे १७ वे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होऊ शकते.तसेच चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढल्यास आरक्षण भिन्न स्वरूपाचे असू शकते. जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि त्यानंतर नगर परिषदा व नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून,आता महापौरपदाचे काय आरक्षण निघते,याकडे लक्ष लागून आहे.
