झरेकाठी सोमनाथ डोळे नेहमीच्या धकाधकीच्या जीवनाला थोडी वेगळी वाट देऊन राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील नानासाहेब सहादू कडू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये १९८३ च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा भावनिक वातावरणात पार पडला.
प्रसंगी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पी.बी.कडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी बेचाळीस वर्षातील दिवंगत थोर व्यक्ती,अध्यापक, विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रसंगी उपस्थित अध्यापक शंकरराव गागरे, कबीर तांबोळी जी.बी.सुर्वे,पंढरीनाथ हिरगळ, सौ.कलगुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक श्री.हिरगळ यांचा वाढदिवस देखील या कार्यक्रमात साजरा करण्यात आला.
सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.येथून पुढचे जीवन कसे जगावे याबद्दल पण मोलाचा सल्ला दिला.
माजी विद्यार्थी यशवंत भोसले यांनी शाळेच्या गणवेशात येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
त्यांनी त्यावेळची घरातील माणसांची शैक्षणिक ओढ व जोडीला बेताची परिस्थिती अत्यंत उत्कृष्ट रित्या वेशभूषेतून व शब्दांत सादर केली.
सर्वांनाच गहिवरून आले.सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना व भावनांना वाट मोकळी करून दिली.
या कामी शाळेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य पंकज कडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माजी विद्यार्थी अनिल लोढा,प्रमोद नालकर ठकसेन पर्वत, उद्योगपती लक्ष्मण डोळे,प्रकाश वालझाडे आदींनी कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन केले.
