आश्वी संजय गायकवाड गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाचा दीप प्रज्वलित करणारे,संयम,संस्कार व समर्पणाचे प्रतिक प्राचार्य अशोक नामदेव गिते यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवारी (दि.२ नोव्हेंबर) शेडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयाच्या परिसरात सकाळी ९.०० वाजता होणाऱ्या या सोहळ्याला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे,सत्यजित तांबे हे गिते या शिक्षकांचे माजी विद्यार्थी असून,गुरु-शिष्याच्या या भावनिक क्षणाला विशेष महत्त्व लाभले आहे.
प्राचार्य गिते यांनी केवळ अक्षरज्ञानच नव्हे,तर जीवनमूल्ये, नैतिकता आणि समाजभान यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करत आहेत.
या सन्मान सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर,माजी विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ,तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून,संयोजकांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
