नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील ओझर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवाहासाठी विक्रीच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी तीन महिलांना दोषी ठरवीत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा निफाडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कोऱ्हाळे यांनी सुनावली आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने दि. २३ जुलै २०२५ रोजी ओझर पोलीस ठाण्यातला पीडितेस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली होती. तपासाअंती पीडितेस प्रियंका देवीदास पानपाटील, रत्ना विक्रम कोळी व सुरेखा जागो भिल्ल यांनी पळवून नेले. गोविंद मनसारे, नानुराम मनसारे यांनी पीडितेस रवी मनसारे याच्यासोबत विवाहासाठी खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्यांना अटक करुन आरोपपत्र तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी निफाड
जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार रत्नाकर बागूल यांनी कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. एल. कापसे यांनी फिर्यादी पिडित व तपास अधिकारी अशोक रहाटे यांच्यासह एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविली.
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांवरून फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पीडितेस प्रियंका पानपाटील, रत्ना कोळी व सुरेखा भिल्ल यांनी संगनमताने पळवून नेल्याचे सिद्ध झाले.
त्यावरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. को-हाळे यांनी तिन्ही महिलांना दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.उर्वरित तीन संशयितांची मुक्तता करण्यात आली.
