झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे नुकतेच पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील अण्णासाहेब कारभारी कांबळे हे भाजीपाला व्यवसाय करतात.ते नुकतेच पहाटेच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी निंभेरे येथून राहुरी बाजार समितीकडे आपल्या दुचाकी वरून जात असताना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला भक्ष्याच्या शोधत दाबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकी वर झडप मारली.
अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये कांबळे मोटरसायकलसह रस्त्यावर फेकले गेले.त्यांनी प्राणपणाने आरडाओरडा करत मदतीसाठी हाका मारल्या. आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करणारे शेतकरी घटनास्थळी धावले.मानवी हालचाल दिसताच बिबट्या झाडीत पसार झाला.
या हल्ल्यात कांबळे यांच्या कपालावर,गालावर,नाकावर तसेच गुडघ्यावर खोल जखमा झाल्या आहेत. स्थानिकांनी तातडीने त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण क्षीरसागर यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय,अहिल्यानगर येथे हलविले.
घटना समजताच वनविभागाचे कर्मचारी संदीप कोरके,निलेश जाधव आणि मुसा पठाण यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.वाढत्या बिबट्यांच्या हालचालीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी तालुक्यातील वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणावे, शासनाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच शांताराम सिनारे,तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे,भीमराज हारदे,सेवा सोसायटी अध्यक्ष बाळकृष्ण हारदे,अमोल हारदे, प्रकाश सिनारे,शिवा हारदे, मनोज हारदे,ज्ञानदेव साबळे, बबलू सिनारे,जिजा बापू सिनारे, बबन सिनारे,दत्तात्रय सिनारे, हरिभाऊ सिनारे,सुनील ढेपे, अमोल ढोपे,सर्जेराव सिनारे, रोहित सिनारे,ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे.
