नाशिक मनपा कडून रस्ते दुरुस्ती कामांच्या निविदा प्रसिद्ध
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील रस्ते दुरवस्थेप्रश्नी आ. प्रा.देवयानी फरांदे यांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेला जाग आली असून नाशिक महापालिकेकडून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निविदा प्रसिद्ध केली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे,वाहतूक कोंडी व नागरिकांना होणारा त्रास यावरून आ. प्रा.देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे,आ.ॲड.राहुल ढिकले हे आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर आक्रमक होत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदकाम करून ते अर्धवट अवस्थेत सोडल्याचा मुद्दा खास करून उपस्थित करण्यात आला. दुरुस्तीस विलंब केल्यास
अधिवेशनात जाब विचारण्यात येईल, अशी तंबीही आमदारांनी दिली.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएल कंपनीची कामे त्वरित थांबवा, तातडीने खड्डे बुजवून अतिक्रमण काढा,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. एमएनजीएलने गॅस पाईपलाईन करता रस्ते खोदले; परंतु काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती न करता अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली.
आ. प्रा. फरांदे यांनी यापूर्वीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत रस्त्यांचा प्रश्न मांडला होता;परंतु नागरिकांना होणारा त्रास,वाहतूक कोंडीची समस्या यामुळे आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.
अखेर आमदारांच्या भूमिकेनंतर नाशिक महानगरपालिका प्रशासनाला जाग आली असून महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी तातडीने प्रक्रिया राबवत निविदा प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघातील कामांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रभाग ७ मधील एमएनजीएल गॅस पाईपलाईनसाठी व इतर केबल टाकण्यासाठी तोडण्यात येणारे रस्ते दुरुस्त करणे, सिद्धार्थनगर ते श्रद्धा पेट्रोल पंप रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, पी ॲण्ड टी कॉलनी परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे. प्रभाग १२ मधील एमएनजीएल गॅस पाईपलाईनसाठी व इतर केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणारे रस्ते दुरुस्त करणे,
प्रभाग १३ मधील सरस्वती नाल्याकडे जाणारा सारडा सर्कल,शालिमार,कान्हेरेवाडी, अण्णा भाऊ साठे चौक, खडकाळी सिग्नल, दुधबाजार, मेनरोड येथील पावसाचे पाणी पावसाळी गटार लाईनला जोडण्यासाठी नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकणे, नाशिक पश्चिम विभागातील ड्रेनेज दुरुस्ती करावयच्या कामातील शिल्लक राहिलेल्या रकमेतून अस्तित्वातील डांबरी रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे, आयटीआय चौक-इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते महात्मानगर पाण्याची टाकी व विविध रस्ते विकसित करणे. छपरीची तालीम ते आझाद चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे. पूर्णवादनगर,अभ्युदय कॉलनी, उदय कॉलनी,
नक्षत्र कॉलनी परिसरातील रस्ते विकसित करणे, शरणपूर गावठाण परिसरातील गटारींची दुरुस्ती करून रस्ते काँक्रिटीकरण करणे. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ मधील सुलभ व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती करणे, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान-शहरी बेघर निवारा या घटकांतर्गत मानसिक विकलांग बेघर व्यक्तींसाठी विशेष निवारा शेड शाळा क्रमांक १,हुंडीवाला लेन,भद्रकाली या इमारतीत उभारणे, नाशिक पश्चिम विभागातील पुतळे व स्मारकांची देखभाल-दुरुस्ती करणे आदी कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
