सामाजिक उपक्रम;वारकरी संप्रदायासाठी सेवा कार्य
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने नुकतेच दिंडी यात्रेला निघालेल्या वारकरी संप्रदायासाठी एक सामाजिक सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना फराळाचा प्रसाद,मेडिकल किट तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
या सेवेचा उद्देश वारकऱ्यांना त्यांच्या यात्रे दरम्यान आरोग्यदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी मदत करणे,तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सेवाभाव निर्माण करणे हा होता.विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन फराळाचे वाटप केले आणि गरजू वारकऱ्यांना प्राथमिक उपचार साहित्य असलेली मेडिकल किट दिली.
संस्थेचे शिक्षकवर्ग, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.या उपक्रमाच्या आयोजनात फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला.कार्यक्रम दरम्यान वारकऱ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी समाजसेवेचे महत्त्व आणि आरोग्यविषयक जनजागृती याबाबतही माहिती दिली.
संस्थेचे प्राचार्य डॉ.किरण शिंदे यांनी सांगितले की, “संस्थेचा उद्देश केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व,करुणा आणि सेवाभाव विकसित करणे आहे. वारकरी सेवेचा हा उपक्रम त्या दिशेने एक पाऊल आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना रुजली असून,संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
