नेहमी यशस्वी घौडदौड करणाऱ्या भाजपला धक्का;त्र्यंबक मध्ये राष्ट्रवादीने उघडले खाते

Cityline Media
0
नगराध्यक्षपदासाठी ८, तर प्रभागातील १९ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात

नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबक नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक चुरसीची ठरली आहे. माघारीसाठी भाजपा, रााष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माघारीसाठी नुकतीच हजेरी लावली.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) यांना एक जागा बिनविरोध करण्यात यश आले.मात्र भाजपाच्या नेत्यांना एका जागेवर पाणी सोडावे लागले.
              छाया रेखांकन-प्रकाश कदम 
यापूर्वीच्या दोन सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक वेळेस १ सदस्य बिनविरोध करत खाते उघडणाऱ्या भाजपाला आलेले अपयश चर्चेचा विषय ठरला आहे.नेहमी यशाकडे घोडदौड करणाऱ्या भाजपबाबत असे प्रथमच घडले आहे.उमेदवार निश्चीत करण्यापूर्वी त्र्यंबक शहरात यावेळेस २१ विरूध्द ० असा नारा देत मित्रपक्षांना एकही जागा न देण्याची चर्चा होती. त्यामुळे महायुती झाली नाही. मात्र अखेर १ जागा राष्ट्रवादीला बिनविरोध करण्यात भाजपाचा हातभार लागला आहे.

 नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत ८ तर प्रभागातील १९ नगरसेवक पदांच्या स्पर्धेत ५३ उमेदवार आहेत.चिन्ह वाटपानंतर लढतीचे स्वरूप स्पष्ट होणार असले तरी आजच्या घडीला भाजपा विरूध्द राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना असा तिरंगी लढतींचा सामना होणार आहे.

येथून पुढील १० दहा दिवस शहरातील वातावरण ढवळून निघणार आहे. भाजपासाठी नाशिक येथून मा. आमदार बाळासाहेब सानप, विजय साने,जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव,नाशिक जिल्हा बँकेचे मा.अध्यक्ष परवेज कोकणी आदी सकाळपासून येथे उपस्थित होते.

 माघारीच्या पूर्वसंध्येला इतर राजकीय पक्षांचे तिकीट घेतलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यात येत होती.अखेरच्या क्षणाला किमान २ ते ३ उमेदवार बिनबिरोध होतील,अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त झाली होती.

प्रत्यक्षात माघारीच्या वेळेस आमदार हिरामण खोसकर,ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे, शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांसह पक्षांच्या नेत्यांनी प्रभाग क्रमांक १ ब मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार मंजू वारूणसे यांच्या समोरील उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले.

यामध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवाराची देखील माघार झाली आणि राष्ट्रवादीचे खाते उघडले. त्यानंतर भाजपाच्या काही उमेदवरांना बिनविरोध करण्यासाठी नेते मंडळी बराच वेळ प्रयत्न करत राहीले. परिसरात काही नावे बिनविरोध झाल्याची चर्चा घडली मात्र प्रत्यक्षात काहीही हाती लागले नाही.अखेर भाजपा पदाधिकारी रिकाम्या हाताने माघारी गेले.

बिनविरोध झालेल्या मंजू वारूणसे यांचे पती रविंद्र वारूणसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. वारूणसे कुटुंबातील सदस्यांनी प्रथमच निवडणुकीत सहभाग घेतला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना बिनविरोध करण्यात सहकार्य केलेले नेते, उमेदवार यांनी सहकार्य करत वारूणसे परिवारावर विश्वास ठेवला आहे. त्यास आम्ही सार्थ करणार आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!