म्हाळसा राणीचा मामा आमदार अमोल खताळ तर खंडोबा देवाचे मामा मदन पारख यांना मान
झरेकाठी सोमनाथ डोळे येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शहरातील साळीवाडा येथील मल्हार मार्तंड खंडोबा मंदिरात मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात खंडोबा-म्हाळसा यांचा शुभमंगल सावधान विवाह सोहळा नुकताच पार पडला.यावेळी खंडोबा देवाचे‘ मामा’ होण्याचा मान खंडोबा भक्त व व्यापारी मदन पारख यांना देण्यात आला,तर म्हाळसा देवीचे ‘मामा’ म्हणून आमदार अमोल खताळ यांना मान देण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवाची रंगत दुपटीने वाढली होती.साळीवाडा येथून खंडोबा देवाच्या पालखीची वाजत-गाजत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली.मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी साडेबारा वाजता हजारो खंडोबा भक्तांच्या उपस्थितीत खंडोबा आणि म्हाळसा यांचा लग्न सोहळा पार पडला.
यावेळी आमदार अमोल खताळ आणि,त्यांची पत्नी सौ.नीलम खताळ,खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच होलमराजा भक्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.देवाच्या शुभविवाहानंतर भक्तांनी पारंपरिक तळी भरणे आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला.भाविकांसाठी वांगे-भरीत,भाकरी आणि बुंदीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता.
हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेत भक्तीभावाने चंपाषष्ठी उत्सव साजरा केला.यावेळी खंडोबा देवस्थानचे आप्पासाहेब केसकर मदन पारख होलम राजा काटकर मंडळाचे प्रमुख तुकाराम काठे गोविंद भरीतकर संभाजी तनपुरे भारत काळे श्रीगोपाल पडताणी पुरुषोत्तम जोशी यांच्यासह खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार संघातील जनतेच्या पाठीमागे तुमचे आशिर्वाद राहु द्या;आमदार खताळांचे खंडोबास साकडं
मला भाचा भाची नसल्यामुळे कधी मुला मुलीच्या पाठीमागे उभे राहण्याचे भाग्य लाभले नाही परंतु साळीवाडा येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे मामा होण्याचे भाग्य लाभले.खंडोबा महाराजांचा कृपाशीर्वाद माझ्यावर कायमच राहिला आहे परंतु या माझ्या सारख्या मायबाप जनतेवरही असला पाहिजे यासाठी मी खंडोबा देवाला प्रार्थना केली आहे. माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे तुमच्या आशीर्वाद कायम राहू द्या असे साकडे आमदार अमोल खताळ यांनी खंडोबा चरणी घातले पर्यटन विकासाच्या माध्यमातून महायुती सरकारकडून या खंडोबा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला आहे जसा जसा माझ्याकडून शक्य होईल तशी तशी मदत करत राहील असे यावेळी आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
