नाशिक दिनकर गायकवाड व्याजाचे पैसे घेऊन देखील पावणे तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या खासगी सावकाराला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आर्थिक अडचण असल्यामुळे दि. ३० जून २०२२ रोजी हेमंत कृष्णा कापसे (वय ४१, रा. जेलरोड, नाशिकरोड) यांनी कैलास मैंद यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.अडीच लाख रुपये व्याजाच्या बदल्यात मैंद याने कापसे यांची चारचाकी गाडी ठेऊन घेतली होती. दोन महिन्यांनंतर कापसे व्याजाचे
पैसे व उधार घेतलेले पैसे परत घेण्यासाठी गेले असता कैलास मैंदने कापसेंकडून ५० हजार रुपये घेऊन आणखी २ लाख ७५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती.खंडणीची रक्कम न दिल्यास कुटुंबियांना व फिर्यादी कापसे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी कैलास मैंदचे हस्तक संतोष कुशारे व फरान सैय्यद यांनी देखील खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कापसे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी कैलास बाबूराव मैंद हा फरार झालेला होता. त्याचा शोध घेत असताना उपनगर पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांना गोपनिय माहिती मिळाली की, मैंद याचे लोकेशन मुंबई नाका परिसरात आहे.शिरसाठ यांनी तांत्रिक विश्लेषण शाखा यांच्याकडून वेळोवेळी त्याचे लोकेशन घेत तो ग्रामीण भागात असल्याचे समजले.पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता वडाळीभोई येथील एका प्लॉटिंगच्या साईटवर मैंद असल्याचे समजले.पोलिसांना पाहताच मैंद पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मैंदवर यापूर्वी पुणे व नाशिक येथे ७ गुन्हे दाखल आहेत.मैंदला न्यायालयात हजर केले असता त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
