सकाळ-संध्याकाळ बिबट्याच्या डरकाळ्या!; दहशत कायम
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील क्षिरसागर वस्तीवर रविवारी (दि. २३ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी ५ वाजता बिबट्याने थेट घरासमोर झेप घेऊन शिकार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घराच्या अगदी जवळ मक्याच्या शेतात भक्ष्याच्या शोधत दबा धरून बसलेल्या बिबट्याने येथील अंगणातील कोंबडीवर क्षणात झडप घालत तिला उचलले.मात्र,याच कोंबड्यांमुळे तीन वर्षांची बालिका कु.सान्वी शिवा क्षिरसागर ही थोडक्यात बचावली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
अंगावर काटा आणणारा हा थरार! असून परिसरातील लोकांनी येथे भेट देऊन काळजी व्यक्त केली.ही घटना प्रवरा उजव्या कालव्यालगत जगुमाई ओढा आणि ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीजवळ असलेल्या क्षिरसागर यांच्या वस्तीवर घडली.
सायंकाळी सौ.जनाबाई नामदेव क्षिरसागर अंगणात दळण करत होत्या,तर त्यांच्या शेजारील खुर्चीत त्यांची नात, सान्वी खाऊ खात बसली होती.दळणातील कुचिर खाण्यासाठी काही कोंबड्या समोर फिरत होत्या.अंदाज घेत बिबट्या काही क्षणात इतका जवळ आला क्षणार्धात कोंबडीला तोंडात पकडले आणि शेतात धूम ठोकली.
तेव्हा लहानग्या सान्वी असलेल्या कोंबडीमुळे ती थोडक्यासाठी बचावली काळजात धस्स करणाऱ्या या प्रसंगाने प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवत होता.परिसरातील नागरिकांच्या मते,जर तिथे कोंबड्या नसत्या तर मोठा अनर्थ ओढवला असता.
- रात्री आठ वाजता पुन्हा बिबट्याचे 'दर्शन'!
जनाबाईंनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली.त्यांचा आवाज ऐकून डॉ.सचिन क्षिरसागर, रामा क्षिरसागर, सोमनाथ क्षिरसागर तातडीने धावले. परंतु, तोपर्यंत बिबट्या कोंबडी घेऊन मक्याच्या शेतात पळून गेला होता.पण या घटनेपेक्षाही अधिक धास्ती वाढवणारी बाब म्हणजे, तोच बिबट्या त्याच रात्री सुमारे ८ वाजता पुन्हा घरासमोर आला आणि त्याने डरकाळ्या फोडल्या! बिबट्याच्या या वाढत्या हिंसकपणामुळे क्षिरसागर कुटुंबात भयाचे वातावरण पसरले आहे.
- बिबट्यांच्या वाढत्या संख्येने नागरिक संतप्त याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी दामोधर क्षिरसागर यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून तीन बिबटे पकडले होते. तसेच,शेजारील शेडगाव शिवारातही मागील आठवड्यात पुन्हा तीन बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले आहेत.
या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या संपूर्ण परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यांना आता मानवी वस्तीत शिकार करण्याची सवय लागली आहे.या बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक कमालीचे धास्तावले आहेत.वनविभागाने तातडीने या वस्तीवर पिंजरे लावून नागरिकांचा जीव वाचवावा,अशी जोरदार आणि संतप्त मागणी स्थानिकांनी केली आहे.
