इस्कॉनचे जगविख्यात गुरु परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज व गायक अतुल दिवे यांची होणार जुगलबंदी
पत्रकारांच्या अधिवेशनात रंगणार सांस्कृतिक महोत्सव
मुंबई सोमनाथ डोळे‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’तर्फे पंढरपूर येथे होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनात दोन विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) चे वर्तमान गुरु व किर्तन सम्राट म्हणून ओळखले जाणारे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या सुमधुर वाणीतून 'हरे मुरारे' भजन संध्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांना प्राप्त होणार आहे, तसेच प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि गीतकार अतुल दिवे ‘भक्ती आणि देशभक्ती’ या गझलसंध्येच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
१५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन मंदिराच्या सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचा विशेष संग व सानिध्य या कार्यक्रमामध्ये प्राप्त होणार आहे. तसेच महाराजांचे अमेरिकन संन्यासी शिष्य परमपूज्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज व इटली, हंगेरी इत्यादी अन्य देशातून येणाऱ्या इस्कॉन अनुयायींच्याद्वारे सादरीकरण होणार आहे.
परमपूज्य लोकनाथ स्वामी हे इस्कॉनचे वर्तमान दीक्षा गुरु असून त्यांनी अध्यात्मिक शिक्षण, आरोग्य शिबिरे, गोसंवर्धन आणि अन्नदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, नागपूर, अमरावती, जळगाव, बीड, सोलापूर, सांगली, आरवडे तसेच नोएडा, दिल्ली अशा ठिकाणी महत्त्वपूर्ण भव्य आणि दिव्य मंदिर प्रकल्प उभारले जात आहेत.
त्यांनी जगभरातील सुमारे १०० पेक्षा अधिक देशांमध्ये १०८ हुन अधिक पदयात्रा/दिंडी सोहळ्यांचे आयोजन केलेले आहे.आज मितीला महाराष्ट्र, बंगाल, उडीसा,उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये व देशाबाहेरही हरिनाम, आध्यात्मिक ग्रंथ व महाप्रसाद वितरण करणाऱ्या या दिंड्या वर्षभर गावोगाव प्रचार प्रसार करीत आहेत.
त्याबरोबरच त्यांनी 'भूवैकुंठ पंढरपूर', 'कुंभ', ' ब्रजमंडल दर्शन', 'श्रीकृष्ण स्वरूप चिंतन', 'सुखी जीवनाचा मार्ग', ' संस्कृतोच्चारणम्', ' माय प्रभुपाद', ' फेस्टिवल्स'इ.अनेक आध्यात्मिक ग्रंथसंपदा दिलेली आहे. तसेच त्यांचे जगभरातील ३० हून अधिक देशांमध्ये दहा हजारहून अधिक शिष्य आहेत. त्यांच्या या जागतिक योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया भूवैकुंठ सेवा आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अशा या जगत विख्यात गुरु परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचा सहवास मिळणे हा पत्रकारांसाठीही एक प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.दुसऱ्या विशेष कार्यक्रमात, ३० चित्रपट, ९२ मालिका आणि दोन हजारांहून अधिक गाण्यांची निर्मिती करणारे अतुल दिवे ‘भक्ती आणि देशभक्तीचा संगम’ या भावस्पर्शी संगीतसंध्येतून रसिक पत्रकारांना मंत्रमुग्ध करतील.
मूळचे संभाजीनगरचे असलेले आणि सध्या मुंबईत कार्यरत असलेले अतुल दिवे यांच्या प्रत्येक सादरीकरणातून विठ्ठलभक्ती आणि देशसेवेची भावना झळकते. त्यांच्या सोबत वैशाली राजेश,जय अनिल आणि त्यांच्या चमू कलाकारही सहभागी होणार असून ‘भक्तिगीतां’सह ‘खास गझलसंध्या’ही सादर केली जाणार आहे.
