जि.प,पंचायत समिती निवडणुकी आधीच आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द मध्ये धुळीचा धुराळा
सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ
झरेकाठी सोमनाथ डोळे सध्या महाराष्ट्रात नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे व त्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने राजकिय घमासन सुरु झाले असून राजकिय धुराळा उडायला सुरुवात झाली मात्र संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक शासकीय विश्रामगृह ते आश्वी खुर्द श्री स्वामी समर्थ केंद्र या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर धुळीचा धुराळा उडाला असून नागरिकांचं आयुष्य धोक्यात आणलं आहे.
पावसामुळे या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे की रस्ता आहे की खड्डा हेच समजेनासं झालंय.रोज विद्यार्थी,शेतकरी, नोकरदार,ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. वाहतुकीचा प्रचंड ताण आणि खड्ड्यांमुळे अपघात ही रोजचीच बाब झाली आहे.
हिवाळ्याला सुरूवात होताच मोठया प्रमाणात धुळ उडण्यास सुरुवात झाल्याने दोन्ही गावची बाजार पेठ धुळीत हरवली असुन सध्या संगमनेर प्रवरानगर दोन्ही साखर कारखान्यांसाठी वाहनातून ऊस वाहतूक सुरू आहे लग्न हंगाम सुरू असुन नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली त्यामुळे दिवसभर दुकाना मध्ये धुळीचे लोळ सुरु आहे.
स्थानिक अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे धुळीमुळे खवय्ये थांबत नाही तर दवाखाने मेडीकल कापड दुकाने जनरल स्टोअर्स किराणा मॉल ऑटो पार्ट भांड्याचे दुकानदारांची परिस्थिती भयानक झाली असून दुकानांची धुळ काढण्यासाठी स्वतत्रं मजुर लावुनही धुळ कमी होत नाही.
दुकांनापुढे पाणी मारले जाते तात्पुरता दिलासा मिळतो मात्र तिव्र उन्हाने हा आनंद फक्त दहा मिनिटेच राहतो पुन्हा तिच धुळीची परिस्थिती हि अवस्था पुढे काही दिवस जर कायम राहीली तर पेठेवर मंदी येणार असुन दोन्ही गावच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना या संकटाचा सामना करण्याची आली आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रसार माध्यमे सोशल मीडिया यांनी वेळो वेळी रस्त्याची दुरवस्था होणारे अपघात याबाबत भुमिका घेतली मात्र सार्वजानिक बांधकाम विभाग सुस्त निद्रिस्त झाला असुन साधे रस्त्याचे खड्डे बुजवण्याची तसदी घेत नाही हे येथील लोकाचे दुर्दैव असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले असुन या प्रश्ना संदर्भात राज्याचे जलसंपदा विभागाचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन संपुर्ण माहिती दिली जाणार असल्याचे व्यावसायिक संघटनेने सांगितले आहे.
प्रवरा नदीवरील पूल तर अपघातांचे केंद्र ठरत आहे.डांबर उखडलं असून मोठमोठे खड्डे झाले आहेत,पुलावर दोन्ही बाजूला माती साचली असुन त्यावर गवत उगवलं आहे तसेच आश्वी बुद्रुककडून पुलावर वेड्या बाभळीचे झाडे उगवले आहे तसेच आश्वी खुर्द स्मशान भुमी समोर पुलाच्या भराव्याला निखळण्यास सुरुवात झाली. पुलाच्या आश्वी खुर्द व आश्वी बुद्रुक दोन्ही कडुन कुठलेही दिशादर्शक फलकच नाहीत. त्यामुळे या पुलावरून जाणं म्हणजे अक्षरशःजीवावर उदार होऊन प्रवास करणं झालं आहे.
आश्वी खुर्द गावात शिरताच रस्ता संपतो आणि फक्त खड्ड्यांचं साम्राज्य सुरू होतं. तर गावातून जाणं म्हणजे नरकयात्राच ठरते. हा रस्ता केवळ दोन गावांना जोडत नाही तर १५ ते २० गावातील नागरीक याच रस्त्याने दररोज ये जा करत असुन याच रस्त्याने संगमनेर,लोणी,साकूर या प्रमुख मार्गांला जोडले जातात.या रस्त्यावर आठवडे बाजार,पेट्रोल पंप,शाळा,बँका, दवाखाने,मॉल,शोरूम्स् असल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी रहदारी असते. एवढं महत्त्वाचं ठिकाण असूनही प्रशासनाचं लक्ष या टप्प्याकडे गेलेलं नाही.
नागरिक आता सरळ सवाल विचारत आहेत – दररोज मुलांना शाळेत सायकलने पाठवताना अपघात झालाच तर जबाबदार कोण? एवढा मोठा रस्ता होतोय पण आमच्या दोन किलोमीटरकडे कोणी लक्ष देत नाही.” तरुणांचा प्रश्न अधिक धारदार – “रोज अपघात होतात, कोणीच दखल घेत नाही.मोठा अपघात झाल्यावर तरी सरकार उत्तर देणार का?असा संतप्त सवाल जनता करीत आहे.
येथील त्रस्त नागरिकांची ठाम मागणी आहे की या दोन किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा. महामार्गाचं कौतुक योग्यच आहे, पण नागरिकांच्या न्याय्य मागण्या दुर्लक्षित करणं धोकादायक ठरेल.शासनाने आणि ठेकेदार व संबंधीत कंपनीने लगेच जबाबदारी स्विकारून या टप्प्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
-आश्वी खुर्द-बुद्रुक दोन कि.मी.रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
राहाता पानोडी ( संगमनेर )हा ३६ कि.मी. लांबीचा काँक्रीट महामार्ग तब्बल १५४ कोटीच्या खर्चातुन उभारला जात आहे महाराष्ट्र राज्य पायाभुत सुविधा महामंडळ मुंबई यांच्या मार्फत हे काम सुरु असुन मोठया यंत्रसामग्रीसह गुणवत्ता पुर्ण व जलद गतीने रस्ता उभा राहत आहे लोहारे ते आश्वी बुद्रुक शासकीय विश्रामगृहापर्यत रुंदी करण खोलीकरण करत एका दिशेने आधी काँक्रीट व त्यावर स्टिल टाकुण दुसरा पक्का थर टाकुण पूर्ण झाला असून त्या लगत साईट पटटा भरावा भरत आहे त्यामुळे रस्ता लवकर होईल अशी अपेक्षा असताना आश्वी बु॥ आश्वी खुर्द ह्या दोन कि.मी. रस्त्याचे काय हा प्रश्न सध्या स्थानिकांना पडत आहे या रस्ताचा प्रश्न त्वरित सोडवा अन्यथा रस्त्यावर जनता उतरेल यात तिळमात्र शंका नाही.
