त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धानोरे घाट उजळला दीपोत्सवाच्या लख्ख प्रकाशात

Cityline Media
0
काकड आरती सांगता, तुळशी विवाह, प्रवरामाई आरती, प्रवचन व महाप्रसादाने भाविक मंत्रमुग्ध

झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील धानोरे घाटावर नुकतेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने भक्तिमय आणि नयनरम्य दीपोत्सवाचा भव्य सोहळा पार पडला दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने, फटाक्यांच्या आतषबाजीने, सुरेल सनई-चौघड्यांच्या निनादाने आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटात संपूर्ण घाट परिसर उजळून निघाला.
मंदिरे, घाट परिसर, प्रवरामाई मंदिर आणि देवस्थान ट्रस्टच्या परिसरात दीपोत्सवाच्या पवित्र सोहळ्याने भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी काकड आरतीची सांगता, तुळशी विवाह, प्रवरामाईची आरती आणि ह.भ.प. धावणे महाराज यांचे प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.सायंकाळी सूर्यास्तानंतर दीपोत्सवाची सुरुवात होताच परिसर सोनेरी तेजाने उजळून निघाला.ह.भ.प. धावणे महाराज यांनी आपल्या प्रवचनातून त्रिपुरारी पौर्णिमेचे आणि काकड आरतीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व भाविकांना समजावून सांगितले.

 भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून धर्माचे रक्षण केल्याची कथा सांगत भक्तांना सत्कर्म, दान आणि सकारात्मकतेचा त्यांनी संदेश दिला.या कार्यक्रमात भाविकांनी एकत्र येऊन सकारात्मकतेचे आणि श्रद्धेचे दिवे प्रज्वलित केले.मंदिर परिसरात रांगोळ्यांच्या पायघड्या,विद्युत रोषणाईचे झगमगाट,आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण धानोरे घाट एक अलौकिक दृश्य बनला होता.दिव्यांच्या समुद्रात न्हालेला घाट पाहून प्रत्येकाचे मन हरखून गेले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी नदीत दीपदान करून भगवान शंकराच्या पवित्र नामस्मरणात लीन झाले.अनेक गावांमधून आलेल्या भाविकांनी पहाटेच्या वेळी भूपाळी, टाळ, वीणा आणि मृदुंगाच्या गजरात काकड आरती करून भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली.

पौर्णिमेच्या या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे या दिवसाला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असे म्हटले जाते. या दिवशी केलेले दान, पूजा आणि दीपदान विशेष फलदायी मानले जाते. त्यामुळेच हजारो भाविकांनी श्रद्धेने दिवे लावून, प्रवरामाईच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.

धानोरे घाटावरील मंदिरांमध्ये हजारो पणत्यांचा दीपोत्सव साजरा झाला. मंदिराच्या परिसरात दिव्यांची रांगोळी, वीज रोषणाई आणि सुवासिक फुलांनी सजवलेली तुळशीवृंदावनाने वातावरण सुगंधित झाले. तुळशी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी भाविकांना आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेताना भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी धनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य, गावातील तरुण वर्ग, महिला मंडळ,भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा दीपोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.त्रिपुरारी पौर्णिमेच्या या निमित्ताने धानोरे घाटावर भक्ती, प्रकाश आणि आनंद यांचे अप्रतिम संगम पाहायला मिळाला. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला घाट जणू भक्तीच्या तेजाने प्रकट झालेला होता.श्रद्धा,संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा हा दीपोत्सव, भाविकांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!