नाशिक दिनकर गायकवाड आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मनमाड पोलिसांनी अवैध शस्त्रांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान दोन स्वतंत्र घटनांमध्ये दोन संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तसेच सहा अवैध हत्यारे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मनमाड पोलिसांनी विशेष मोहीम राबविली आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली.
मनमाड शहरातील काही गुन्हेगारांकडे अवैध पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक
पोलीस निरीक्षक भारत जाधव, सपोनि हेमंत भंगाळे, संदीप झाल्टे, अंबादास झाल्टे, विशाल आव्हाड, रणजित चव्हाण, मयूर पठारे, नितीन मैंद, दीपाली आव्हाड, संगीता वाटपाडे, दिलीप शिंदे, नितीन पानसरे यांच्या सहकार्याने पथक तयार करण्यात आले.
या पथकाने संजय धिवर यांच्या घरावर लक्ष ठेवले. चौकशीदरम्यान त्यांचा मुलगा ऋतिक संजय धिवर (वय २४, रा. विवेकानंदनगर २, मनमाड) याच्या ताब्यातून एक गावठी लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध मनमाड शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, मनमाड पोलिसांनी आणखी एक कारवाई करीत मिलिंद सुरेश उबाळे (रा. चंदनवाडी, मनमाड) यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. घरझडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सहा अवैध हत्यारे हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणीही मनमाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दोन्ही कारवायांची माहिती मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगविरसिंग संधू, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, तसेच अवैध शस्त्रधारकांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनमाड पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, संशयित इसम आणि अवैध शस्त्रधारकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक काळात शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.
