३३ वर्षापासून रखडलेल्या मनपाचा प्रश्न मार्गी;अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये सन १९९३ पासून प्रलंबित असलेल्या दिवंगत मुख्याध्यापक,शिक्षक तसेच सुरक्षा रक्षक यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा दीर्घकाळाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
सलग ३२ ते ३३ वर्षे रखडलेल्या या प्रक्रियेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक व मानसिक संकटांना सामोरे जावे लागत होते. महाराष्ट्र शासनाच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार सर्व प्रकरणांची पुनर्पडताळणी करून नियुक्ती प्रक्रियेला गती देण्यात आली.

निवड समितीसमोर एकूण ३४ दिवंगत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यात ३० मुख्याध्यापक, शिक्षक व ४ सुरक्षा

कार्यालयातील आस्थापना कर्मचारी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यांच्या मदतीमुळे हे कार्य शक्य झाले. या कार्यामुळे प्रशासनात काम करण्याचे समाधान मिळत आहे.

- डॉ. मिता चौधरी, प्रशासन अधिकारी, नाशिक मनपा शिक्षण विभाग.

रक्षक यांचा समावेश होता. एका प्रकरणात संबंधित वारसदारांचेही निधन झाल्याचे आढळून आले. तसेच अशा चार प्रकरणांबाबत अर्ज करताना शासकीय सेवेत असलेल्या व आता सेवानिवृत्त झालेल्या वारसांबाबत पुढील मार्गदर्शनासाठी ती प्रकरणे शासनाकडे राखीव ठेवण्यात आली आहेत.

सविस्तर पडताळणीनंतर १९ वारस अनुकंपा नियुक्तीस पात्र असल्याचे निश्चित झाले. उपलब्ध रिक्त पदांच्या अनुषंगाने संवर्ग-क

मधील १ व संवर्ग-ड मधील १२ अशा एकूण १३ वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शिक्षण विभागात १२ कामाठी व १ लिपिक अशी पदे भरली जाणार आहेत. ज्या शाळांमध्ये कामाठी उपलब्ध नाहीत, त्या शाळांना प्राधान्याने कर्मचारी देण्यात येणार आहेत. या नियुक्त्यांमुळे शाळा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार असून दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पडण्यास मदत होणार आहे.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या हस्ते, तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या उपस्थितीत काल संबंधित वारसांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. आदेश स्वीकारताना अनेक वारसांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या न्यायासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या दिवंगत पालकांच्या स्मृती जागवल्या. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा आणि विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा हा निर्णय नाशिक महानगरपालिकेच्या संवेदनशील, सहृदय व न्याय्य प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!