अनियमितता आढळल्यास तात्काळ कारवाई
नाशिक दिनकर गायकवाड
नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी अनियमितता आढळल्याप्रकरणी व त्रुटी दोन रुग्णालयांची नोंदणी रद्द करीत दणका दिला होता.यानंतर आरोग्य विभागाने पुन्हा शहरात आठ दिवसांपासून रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत १७१ रुग्णालयांची तपासणी केली असून, त्यांचा अहवाल आठवडाभरात तयार केला जाणार आहे.
रुग्णालय तपासणीसाठी ३० पथकांची नियुक्ती केली असून, शहरी आरोग्य प्राथमिक केंद्रातील प्रमुख या समितीत आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व सहाशे खासगी हॉस्पिटलची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र ३० पथके तयार करण्यात आली आहेत.
प्रसूतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधीत परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरणासाठी नगररचना व अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखलादेखील असणे आवश्यक आहे; परंतु नाशिक महापालिका क्षेत्रातील ही प्रसूतिगृहे निवासी क्षेत्रात असल्यामुळे, तसेच इमारतीच्या वापरात बदलाबाबत संबंधितांना नोंदणी व नूतनीकरण सक्तीचे केले आहे.
याकडे दुर्लक्ष केल्याचे तपासणीत आढळल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने नव्याने नियमावली आणली आहे. त्यात प्रामुख्याने नगररचना विभागासह अग्निशमन विभाग, पर्यावरण, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसविणे,खाटांनुसार वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी नियमांचा त्यात समावेश आहे. या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली.
नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील हॉस्पिटलची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली असून,अशी ३० पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने ११ डिसेंबरपासून ६०० पैकी १७१ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी केली जाणार असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले.
