नाशिक दिनकर गायकवाड भाडे तत्त्वावर घेतलेल्या गाडीचे भाडे न देता हे वाहन परस्पर विकून फसवणूक व अपहार करून गाडीमालकास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी चांगदेव ज्ञानेश्वर सोनुने (रा. काठे गल्ली, द्वारका) यांच्या मालकीचे एमएच १५ जेसी ९७५८ या क्रमांकाचे अशोका लेलॅण्ड कंपनीचे वाहन आहे. हे वाहन आरोपी भास्कर केशव जाधव (रा. जाखडी उद्यान, इंदिरानगर, नाशिक, मूळ रा. चांदसे, ता. मालेगाव), भाऊ योगेश विजय जाधव, मित्र अभिराज अशोक
काकवीपुरे,अंबादास आहेर व अजहर शेख (सर्व रा.नाशिक) यांनी संगनमत करून सोनुने यांची अशोक लेलॅण्ड गाडी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली;मात्र ही गाडी भाडेतत्त्वावर घेऊन त्याचे भाडे न देता ही गाडी परस्पर विकून आलेल्या पैशांचा अपहार केला.
फिर्यादी सोनुने हे भाड्याचे पैसे व गाडी परत मागण्यास गेले असता सर्व आरोपींनी मिळून "तुला जिवंत सोडणार नाही," अशी दमदाटी केली.या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार गारले करीत आहेत.
