नाशिक दिनकर गायकवाड अनैतिक संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला दिल्याच्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील द्वारका परिसरात घडली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार गणेश श्याम सकट (वय २०, रा. नागसेन नगर, वडाळा नाका, नाशिक) यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत सुमित सुखारन राखपसरे (वय २८, रा. अवधूतवाडी, पंचवटी) याचे नागसेन वाडी येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते.या बाबतची माहिती संशयित ओमकार अर्जुन गायकवाड (वय २५) याने संबंधित महिलेच्या पतीला सांगितल्याने मयत व आरोपी यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता.
दि. २८ रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास मयत रिक्षाने नागसेन वाडीत आला असता, द्वारका परिसरातील गोदावरी हॉटेलसमोर दर्याजवळ संशयित मोईन कासम सैय्यद (वय २४) याने मयताच्या रिक्षाची चावी काढून घेतली. त्यानंतर संशयिताने कमरेला लावलेला चाकू काढून मयताच्या पोटात भोसकला.
मयत वेदनेने किंचाळत वाकल्यानंतर त्याच्या पाठीवरही वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत मयतास तत्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.या गुन्ह्यात आणखी कोणी सहभाग आहे का, याबाबत सखोल तपास सुरू असून तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ हे करीत आहेत.
