मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदाराच्या पत्नीने दिलेल्या साड्या महिलांनी जाळून टाकल्याची घटना घडली आहे.त्या मुंबई मनपासाठी नगरसेविका उमेदवारी भरण्यास इच्छुक असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे सत्ताधाऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेऊन महिला मतदारांच्या मतांवर शिंदेसेनेचा डोळा आहे. महिलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षाचे मा.खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी सौ.कामिनी शेवाळे यांच्याकडून साड्यांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
मुंबईतील महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे.
जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.आज किंवा उद्या शिवसेना भाजपमध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. काही उमेदवारांच्या नावांवर पक्षाकडून शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वाकडून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक १४२ मध्ये कामिनी शेवाळे यांची उमेदवारी नक्की असल्याचे समजते.मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मतांची प्रचारापासून राजकीय डावपेच आखण्या पर्यंत आघाडी घेण्याचे प्रयत्न शिंदे सेनेच्या सौ.कामिनी शेवाळे यांचे सुरू आहेत. शेवाळे यांनी वॉर्डामध्ये मतदारांना साडी वाटप केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.मात्र स्थानिकांनी ही गोष्ट खटकल्याने प्रभाग क्रमांक १४२ मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवून दिल्या.
आचारसंहिता लागू असूनही साड्या वाटप केल्या जात आहेत, असा आक्षेप ठाकरेंच्या सेनेने निवडणूक आयोगाकडे नोंदवला.चेंबूरमध्ये कामिनी शेवाळे या जिंकण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याची टीका ठाकरे शिवसेनेने केली आहे. शेवाळे यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, चेंबूरमध्ये मशाल पेटणारच,असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.
