दिव्यांगानी आपल्यातील क्षमता ओळखणं गरजेचं - गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे
श्रीरामपूर दिपक कदम दिव्यांग बाळ ज्यांच्या पोटी जन्माला येते.तो माणूस भाग्यवान आहे.कारण हे जे बाळ जन्माला येतं त्यांच्यासोबत एका बाजूचे पारडे जरी कमी असलं तरी दुसऱ्या बाजूने आई-वडिलांसाठी बरंच काही घेऊन येत असतात.याचा जन्म झाल्यामुळे त्याच्या घरात येणारे संकट नष्ट होऊ शकतात.त्या घराची मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकते.त्या घराचे निरोगी आयुष्यमान वाढवू शकते.कारण परमेश्वर सर्वांना सारखच देत असतो.कुणालाही कमी जास्त करत नाही.कारण सर्व लेकरं ही त्याचीच आहे.तुम्ही त्यामुळे आनंद देत रहा,अभ्यास करा आणि आपले मित्र मैत्रिणींशी चांगले वागा.आपल्या शिक्षकांचे चांगले ऐका आपल्यातील न्यूनगंड कमी करून त्यावर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहा. आपल्यातील क्षमता ओळखा गुणवत्ता आपोआप पदरात पडेल.असे प्रतिपादन दिव्यांगा करिता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती श्रीरामपूरचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी केले.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय अहिल्यानगर, रोटरी मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर,आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र,जिल्हा व्यवस्थापन समिती अहिल्यानगर आणि अजित पवार मेडिकल कॉलेज वडाळा महादेव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त आयोजित दिव्यांगा करिता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी पंचायत समिती श्रीरामपूरचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, शिवा ट्रस्ट वडाळा महादेवचे संचालक दिलीप पवार,रोटरी एज्युकेशन ट्रस्ट चे खजिनदार विनोद पाटणी,रोटरी क्लब सदस्य वैभव चुडीवाल, जिल्हा व्यवस्थापन शासकीय समितीचे सदस्य संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांगाकरिता अजित पवार मेडिकल कॉलेजच्या वतीने नेहमीच आरोग्य विषयक मार्गदर्शन व उपचार शिबिराचे आयोजन भविष्यकाळात देखील करण्यात येईल दिव्यांगांच्या असणाऱ्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी शिवा ट्रस्ट नेहमीच दिव्यांग व्यक्तींकरता प्रयत्नशील राहतील असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शिवा ट्रस्टचे संचालक दिलीप पवार यांनी केले. याप्रसंगी नव्याने नियुक्त झालेले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांचा सर्व संस्था व संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक दिव्यांग दिन सप्ताह आणि दिव्यांग कायदा अधिनियम २०१६ व त्यातील २१ प्रकार याविषयी सविस्तर विवेचन मूकबधिर विद्यालयाचे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी संजय साळवे यांनी केले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,१०० मीटर धावणे, ५० मीटर धावणे,गोळा फेक इत्यादीमध्ये यश संपादन केलेल्या मूकबधिर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या उपचार करण्यात आले.त्याचबरोबर श्रीरामपूर शहर व तालुक्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार दीपक तरकासे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे रामदास रासकर,मंगेश सालपे,चंद्रकांत सांगळे,दीपक तारकासे,अतुल साळुंखे,सुरेश गायकवाड,सौ.कौशल्या जाधव,कैलास बनकर, माधुरी आनंदास,कुसुम शितोळे, नंदिनी वक्ते,अरुणा तुरुकमारे, आसान दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सुनील कानडे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
