सोलापूर जिल्ह्यात विशेष अधिकारी नियुक्त
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीतील समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूर जिल्हास्तरावर अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ आणि नियम १९९५ मधील नियम १० अन्वये हे आदेश पारित केले आहेत.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एनडीएमजे) या संघटनेचे राज्य महासचिव केवल ऊके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गीते यांनी मंत्रालय स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.
याची दखल घेऊन जिल्हानियुक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे.नियुक्त विशेष अधिकारी अत्याचार ग्रस्तांना तातडीची मदत-सुविधा उपलब्ध करून देणे, अत्याचारांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, अनुसूचित जाती-जमाती समाजाला त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती करणे, स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे, फिर्यादी साक्षीदारांना पोलीस संरक्षण देणे, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणे, दक्षता नियंत्रण समित्यांच्या बैठका नियमित होतात की नाही, याचा आढावा घेणे आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये तत्काळ कारवाईचे आदेश देणे, अशी जबाबदारी पार पाडणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अन्याय झाल्यास किंवा तपास प्रक्रियेत अडचणी येत असल्यास जिल्हास्तरावर नियुक्त विशेष अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी,असे आवाहन राज्य सचिव वैभव गिते यांनी केले.
