झरेकाठी सोमनाथ डोळे भक्ती,शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम असलेल्या ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या १९ व्या आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.
या सप्ताहाच्या ध्वजारोहण उतरविण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भाविकांनी या सोहळ्याला 'कोहिनूर हिरा' असे संबोधत आपल्या भावना व्यक्त केल्या. "गादी ही महाराजांचा शब्द असते आणि तो शब्द यशस्वी होतोच," याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आल्याचे पाहायला मिळाले.
यावर्षीच्या दाढ खुर्द येथील सप्ताहाला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दाढ खुर्द ग्रामस्थांनी तब्बल २७ लाख रुपयांचे योगदान दिले, तर इतर परिसरांतून १६ लाख रुपयांचा निधी जमा झाला. पंगतीसाठी आणि इतर व्यवस्थेसाठी मिळालेले हे मोठे सहकार्य पुढील सप्ताहासाठी मोठी ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. महिला,तरुण आणि कार्यकर्त्यांच्या चोख नियोजनामुळे हा सोहळा अभूतपूर्व ठरला.
सप्ताहाचा ध्वज उतरविताना मार्गदर्शन करताना दत्तगिरी महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत जीवनाचे सार मांडले. ते म्हणाले की, "कार्याची पावती संघर्षातूनच मिळते. आयुष्यात निंदक किंवा विरोधक असणे गरजेचे आहे; कारण कट्टर विरोधकामुळेच कार्यकर्ता अधिक धडपडणारा आणि सक्षम होतो. ज्याप्रमाणे सासू नसेल तर सुनेला घराचा आकार येत नाही, तसेच विरोधकांमुळे व्यक्तीला पैलू पडतात.
यावेळी महाराजांनी राजकारण आणि पदाच्या लालसेवरही मिश्कील टिप्पणी केली. "साधू-संन्याशाला खुर्ची किंवा गादीची गरज नसते, तर सेवा आणि श्रद्धा महत्त्वाची असते. आजच्या जगात देवाला आणि साधूला निष्काम प्रेम करणारे लोक कमी आणि व्यावहारिक लोकच जास्त भेटतात," असे सांगत त्यांनी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
महाराजांनी आपल्या प्रवचनात नेता आणि कार्यकर्त्यांच्या नात्यावर भाष्य करताना गाय आणि वासरू यांचे उदाहरण दिले.तसेच, "धर्माचे राजसत्तेवर नियंत्रण असावे, तरच सेवातत्व टिकून राहते," असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले.चांगली परिस्थिती ही नेहमी दुसऱ्याच्या कामी आली पाहिजे आणि बुद्धी स्थिर ठेवून भक्तीची ओढ लागणे हाच या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी भारत गिते यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "दत्तगिरी महाराज यांच्यावर परिसरातील जनतेचे अपार प्रेम आहे. हा सप्ताह केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता नदीच्या पलीकडे, म्हणजेच संपूर्ण परिसरात विस्तारावा,हिच आमची सदिच्छा आहे." सप्ताहाच्या प्रसिद्धीसाठी माध्यम प्रतिनिधींनी बजावलेल्या भूमिकेचेही त्यांनी विशेष आभार मानले.
ध्वजा उतरविणे सोहळा प्रसंगी राजेंद्र चकोर,भारतराव गीते, निवृत्ती सांगळे, प्रमोद बोंद्रे, मुकुंद महाराज जोरी, शिंदोडीचे सरपंच,गोरक्षनाथ तांबे,उत्तम कुदनर,योगेश तांबे,सोमनाथ डोळे, राजेश गायकवाड,संजय गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ,महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विलास जोशी यांनी सप्ताहाच्या खर्चाचा सविस्तर तपशील मांडला.पडद्यामागे काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवकांच्या निष्ठेमुळेच १९ व्या वर्षाचा हा 'कोहिनूर' सप्ताह यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार दत्तगिरी महाराज यांनी काढले .
