आश्वी संजय गायकवाड “जन्म आणि मृत्यूच्या प्रवासात प्रत्येकाने चंदनासारखे स्वतः झिजून समाजाला सुगंध देणारे जनहितार्थ जीवन जगावे. जीवनाच्या गणितात चांगुलपणाची बेरीज,वाईट विचारांची वजाबाकी,सद्गुणांचा गुणाकार आणि चुका दूर करणारा भागाकार केला,तरच खऱ्या अर्थाने सुख,शांती आणि समाधान मिळते.धर्ममय व संयमी जीवन जगण्याचा संकल्प नववर्षात प्रत्येकाने करावा,” असे प्रेरणादायी आवाहन संत अक्षय ऋषीजी महाराज यांनी आपल्या अमृततुल्य प्रवचनातून केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जैन धर्म स्थानकात नुकतेच १ जानेवारीला नववर्षाचे स्वागत महामांगलिक, दीक्षार्थी अभिनंदन व वरघोडा (यात्रा) सोहळ्याने अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्यात आले.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य उपप्रवर्तक प.पू. अक्षय ऋषीजी महाराज, अमृत ऋषीजी महाराज आणि गीतार्थ ऋषिजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात हा धार्मिक सोहळा पार पडला.
गुरुवारी सकाळी सुम्मतीलाल गांधी यांच्या निवासस्थानापासून आकर्षक सजवलेल्या रथातून दीक्षार्थी मुमुक्षू कु.हर्षाजी शैलेश पारख (संगमनेर) व कु. चैतालीजी बोकडीया (मालेगाव कॅम्प) यांची भव्य अभिनंदन यात्रा काढण्यात आली.
या यात्रेच्या अग्रभागी पारंपरिक वाद्यांचा गजर, सनई आणि बॅण्ड पथकामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. जैन धर्माचा गौरवशाली ध्वज हातात घेतलेली बालके, डोक्यावर मंगल कलश धारण केलेल्या सुवासिनी, पारंपरिक पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील पुरुष आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला भाविकांमुळे संपूर्ण आश्वी गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले होते.
ही भव्य मिरवणूक जैन धर्म स्थानकात पोहोचल्यानंतर कन्या मंडळ व बाल मंडळाच्या सदस्यांनी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून दीक्षार्थींचे उत्साहपूर्ण स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा गोडगे यांनी केले. उपस्थित भाविकांसाठी सुम्मतीलाल–अविनाश गांधी परिवारातर्फे ‘गौतम प्रसादी’ (महाप्रसाद) चे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी, प्रवरा बँकेचे संचालक संजय गांधी, शैलेश पारख, पारसमल चोरडिया, राजेंद्र गदीया यांच्यासह संगमनेर, आश्वी, लोणी, कोल्हार, साकूर, चाळीसगाव व अहिल्यानगर येथून जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
