क्रांती भारत मिशनचा वर्धापन दिन आणि पांगारकरांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
झरेकाठी सोमनाथ डोळे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा देणारे, जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पा. यांच्या उपस्थितीमुळे सिन्नर तालुक्यातील पांगरी गावात नुकताच मोठा जनसागर उपस्थित होता.
छत्रपती क्रांती भारत मिशनचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आणि मिशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाला जरांगे पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलांच्या पायघडीवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा येथील लखोजी राजे जाधवांचे वंशज,शिवाजीराजे जाधव होते.
प्रमुख अतिथी म्हणून सिंहस्थ कुंभमेळा राष्ट्रीय प्रवक्ते महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज उपस्थित होते.
यावेळी धर्म, अध्यात्म आणि समाजसेवेचे मार्गदर्शक असलेले जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज,जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर,
श्री श्री १००८ महामंडलेश्वर शनिभक्त संत सुखदेव महाराज यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ मान्यवरांना ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमात सामाजिक भान जपत,गोटेवाडी येथील दिवंगत प्रकाश सरोदे यांच्या कुटुंबातील सहा मुलींना विलास पांगारकर यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत चेक स्वरूपात देत माणुसकीचा आदर्श ठेवला.
मनोज जरांगे पा.यांनी आपल्या मनोगतातून मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्याबाबत भूमिका मांडत, संयम,एकजूट आणि संघर्षावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.त्यांच्या बोलण्यातून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केले,तर आभार प्रदर्शन मयूर पांगारकर यांनी मानले.
या भव्य सोहळ्यासाठी परिसरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
