तहसीलदारांकडून सर्कल पाहणीचे आदेश
राहुरी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत प्रसादनगर ते गुंजाळ नाका हा देवळाली प्रवरा चिंचविहिरे शिव रस्ता खुला करून मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचेसह देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मा.उपाध्यक्ष ललित चोरडिया,प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे,देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे आदींनी राहुरीचे तहसीलदार अमित पवार यांची नुकतेच राहुरी तहसील कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देवळाली प्रवरा हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागातून ताहाराबादच्या दिशेने सध्या खडी आणि मुरूम वाहतूक करणारे अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर राहुरी फॅक्टरीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर/ विठा माधव चौकात नगर मनमाड रस्त्यावर येत आहेत.
याच चौकात श्रीरामपुर कडून येणारी वाहनेही येऊन मिळतात.त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी वाहतूक कोंडी सातत्याने पहावयास मिळते. तसेच,या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुले व वृद्ध नागरिकांची त्रेधातिरपीट होते आजवर या चौकात कित्येक अपघात झालेले असून निरपराध नागरिकांचा जीव गेलेला आहे.
येथील वाहतूक कोंडी व अपघात कमी करावयाचे असले तर.जवळपास दोन हजार लोकवस्ती असलेल्या प्रसाद नगर भागातून अत्यंत धोकादायक रित्या ताहाराबाद कडून या चौकाकडे येणारी व जाणारी खडी मुरूम आदी अवजड वाहनांची होणारी जड वाहतूक अन्यत्र वळविणे अत्यंत गरजेचे आहे.
ताहाराबाद रस्त्यावरून प्रसाद नगरच्या मागील बाजूने चिंचविहिरे शिवरस्ता पूर्वेकडे गुंजाळ नाका येथे नगर मनमाड रस्त्याला जाऊन मिळतो हा शिव रस्ता प्रसादनगरच्या बाजूने जवळपास ८० टक्के खुला असून गुंजाळ नाक्याच्या बाजूने केवळ २० टक्के रस्ता बंद आहे.
त्यामुळे विनंती करण्यात आली की महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत प्रसादनगर ते गुंजाळ नाका हा, देवळाली प्रवरा चिंचविहिरे शिवरस्ता गुंजाळ नाक्याच्या बाजूने पब्लिक स्कूल रोड पर्यंत खुला करून मिळावा असे निवेदनाच्या शेवटी म्हंटले आहे.
दिलेल्या निवेदनावर राहुरीचे तहसीलदार अमित पवार यांनी तातडीने सर्कल पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याने लवकरच हा मार्ग मोकळा होईल अशी आशा प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांनी सिटीलाईन न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली..
