नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील ओझर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओझर (तांबट) येथील ऐतिहासिक भेटीस ८९ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आयोजित करण्यात आलेला स्मृतीदिन कार्यक्रम नुकताच येथील बुद्ध विहार,मिलिंद नगर,राजवाडा येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी पत्रकार जुबेर शेख यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.उपस्थित मान्यवर व नागरिकांनीही डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
प्रसंगी कार्यक्रम दरम्यान या ऐतिहासिक भेटीची सविस्तर माहिती सामाजिक कार्यकर्ते धर्मा जाधव यांनी उपस्थितांना दिली. दि. १७ जानेवारी १९३७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ओझर येथे आले होते,त्यावेळी काढण्यात आलेली भव्य मिरवणूक,ओझर राजवाड्यात झालेले स्वागत व बाबासाहेबांचे प्रबोधनपर भाषण यांचा त्यांनी आढावा घेतला.ही भेट महाराष्ट्र शासनाच्या अभिलेखांमध्ये खंड १८,भाग २ मध्ये नोंदवलेली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
यावेळी समस्त जाधव बौद्ध पंच मंडळ,ओझर (मिग),तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास बौद्ध बांधव, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून पुढील पिढीपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व ओझरशी असलेला ऐतिहासिक संदर्भ पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते धर्मा भाऊ जाधव मा.उपसरपंच,रविंद्र देवराम जाधव, चिधु गांगुर्डे सरपंच खेरवाडी, नगरसेवक जय संतोष जाधव,विलास दिनकर कटारे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मधुकर जाधव , चंद्रभान गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी, अभियंता अमोल गायकवाड, शंकर भाऊ जाधव,अभिषेक मायकर, बौद्धाचार्य अक्षय वाघ, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ बागुल सुभाष जाधव,आकाश सोनवणे स्वप्नील राजेद्र जाधव आदी उपस्थित होते.
