कठडे नाहीत, दिशादर्शक फलक नाही जबाबदारीही नाही!
हनुमंतगांव संदिप गावडे राहुरी तालुक्यातील सोनगाव आणि संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला चनेगाव हा रस्ता अक्षरश मृत्यूचा सापळा ठरत असून, बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे भीषण दुर्घटना घडली. ‘आई जेऊ घालीना अन् बाप भीक मागु देईना’,अशी अवस्था या रस्त्याची झाली असून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तसेच आंब्याचा ओढ्यावरील वाहून गेलेल्या पुलाबाबत यापूर्वी प्रसार माध्यमांनी वारंवार वृत्त प्रसिद्ध केल्या होत्या.तरी प्रशासन या रस्त्याकडे सबशेल कानाडोळा करत आहे.येथील ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला;मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला आजतागायत जाग आली नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
खेळखंडोबा झालेल्या या रस्त्याबाबत सविस्तर वृत्त असे की,प्रवरा सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेले कर्मचारी बाळासाहेब अप्पासाहेब दिघे हे कामावरून रात्री दुचाकीवरून घरी परतत असताना आंब्याचा ओढा परिसरात आले असता समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र प्रकाशामुळे क्षणभर दृष्टी दिपल्याने,अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने ते थेट सुमारे पंधरा फूट खोल ओढ्यात कोसळले.रस्ता नेमका कुठे आहे,कडेला कोणतेही संरक्षक कठडे अथवा सूचना फलक नसल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आणखी ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. पंधरा फुट खोल ओढ्यातून ग्रामस्थांनी अपघातग्रस्त श्री.दिघे यांना शिडीच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढले.या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून,वेळीच मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता,अशी चर्चा परिसरात आहे.
सध्या सोनगाव–चनेगाव रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर असून,आंब्याचा ओढा येथील पुलावरील काही नळ्या वाहून गेल्याने रस्त्याची कपार एक बाजूला पुर्ण नष्ट झाली असून येथे कायमचा धोका बनला आहे.येथुन जवळच नावाजलेली दिघे वस्ती शाळा असून येथून दररोज मुंलाची ये-जा सुरू असते.हा रस्ता दोन तालुक्यास जोडणारा हा मुख्य मार्ग असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वाढली आहे.
”एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? “असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे की, आंब्याचा ओढा येथील पुलाचे मजबूतीकरन व रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जलदगतीने सुरू करावे.
रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच ठेकेदार सोनगाव- चनेगाव यां रस्त्याचे कामाबद्दल दिरंगाई करत असेल व निविदा जसे मंजूर झाले आहे त्याप्रमाणे काम करत नसेल तर अशा ठेकेदाराचा परवाना रद्द करून काळ्या यादीत टाकण्याचे धाडस प्रशासकीय यंत्रनेने दाखवावे व नवीन ठेकेदाराची नेमणूक करून काम पूर्ण करावे तसेच तोपर्यंत धोकादायक पुलाजवळ सुचना फलक लावून दुर्घटना होणार नाही यासाठी कठडे बांधून सुरक्षित उपाययोजना करावी,अन्यथा भविष्यात घडणाऱ्या सर्व दुर्घटनांची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रशासनाची राहील, असा गंभीर इशाराही संतप्त नागरिकांनी दिला.आहे.प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
