उघड्यावर थाटलेल्या सुभाष रोडवरील जुनाट फर्निचर दुकानाला भीषण आग

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील सत्कार चौक,सुभाष रोडमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुनाट लाकडी फर्निचर व वापरलेल्या पत्र्याच्या सामानाच्या दुकानाला नुकतीच रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व जुनाट साहित्य जळून खाक झाले.
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने शेजारील दुकाने व मोठी वित्तहानी टळली. मात्र खबरदारी म्हणून संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा रात्रभर बंद ठेवण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे हाल झाले.

या रस्त्याच्या कडेला मलंग इब्राहिम शेख यांचे जुनाट लाकडी फर्निचर, वापरलेले पत्र्याचे कपाट व इतर साहित्याचे उघड्यावर दुकान थाटलेले आहे. काल रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास या उघड्यावर असलेल्या लाकडी साहित्याला अचानक आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

जुनाट लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले. त्यामुळे शेजारी असलेले बारदानाचे दुकान,

वाहनांच्या बॅटरीचे दुकान, हॉटेल व गॅरेजचे मालक धास्तावले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक युवकांच्या मदतीने सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टाळला. आग आटोक्यात आणण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.

विशेष म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी याच दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या ललित ठक्कर यांच्या

गोदामाला आग लागली होती. ती आग दोन ते तीन दिवस धगधगत राहिली होती व अनेक अग्निशमन गाड्यांच्या प्रयत्नानंतर ती आटोक्यात आली होती. वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा रस्त्याच्या कडेला उघड्यावर अनधिकृतपणे थाटलेल्या लाकडी साहित्याच्या दुकानाला आग लागल्याने अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला उघड्यावर चालवण्यात येणाऱ्या अशा य ज्वलनशील साहित्याच्या दुकानांबाबत नवनिर्वाचित नगरसेवक आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!