नाशिक दिनकर गायकवाड व्यसन म्हणजे विनाशाचे द्वार असून,आज देशातील तरुण पिढी,जी भारताचे भविष्य आहे, ती अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील एस. व्ही. के. टी. महाविद्यालयात आयोजित 'नशामुक्त भारत अभियान' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी निरीक्षक देशमुख यांनी सांगितले, की व्यसनामुळे मनावर ताबा राहत नाही व नशेच्या अवस्थेत अनेक गुन्हे घडतात.
व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिलीप पवार होते.अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे कुटुंब व समाज सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, तसेच उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी समुपदेशक रघुवीर नायक यांनी व्यसनाधीनता हा एक आजार असल्याचे सांगत, व्यसनामुळे शारीरिक व मानसिक दुर्बलता, तसेच गंभीर आजार निर्माण होतात, व्यसन व्यक्तीला संपविते व कुटुंब उद्ध्वस्त करते, असे नमूद केले. त्याचे विपरित परिणाम कुटुंबासह समाजावरही होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समुपदेशक ऋतुजा भोई यांनी सध्याच्या काळात मोबाईलचा अतिवापर ही देखील एक प्रकारची नशा असल्याचे सांगत, यामुळे व्यक्ती नैराश्याकडे जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा.अनिल गवळी, प्रा.भारती पाटील, प्रा.सोपान पवार,प्रा. सोनवणे, प्रा. सोमासे व प्रा. मानसी डावरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल गवळी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सीमा रायते यांनी केले.
