रुग्णालयातून डिस्चार्ज दिला,कार्यकर्त्यांनी काळजी करु नये
संगमनेर नितीनचंद्र भालेराव अहिल्यानगर जिल्ह्यातील फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख पॅंथर श्रीकांत भालेराव यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मुंबई येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तातडीने औषधोपचार करण्यात आले.केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी श्रीकांत भालेराव यांची रुग्णालयात भेट घेऊन धीर दिला.
औषधोपचार करणाऱ्या डॉक्टर यांच्याशी चर्चा करून प्रकृतीची चौकशी केली.श्रीकांत भालेराव त्यांना रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
माझे जुने सहकारी आणि आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व पॅंथर श्रीकांत भालेराव यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने आम्हा सर्वांनाच चिंता लागली होती.परंतु डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे त्यांची तब्येत आता स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, त्यांची प्रकृती पुन्हा पूर्वपदावर येत आहे.
संकटाच्या काळात आम्ही फक्त शब्दाने नाही,तर प्रत्यक्षपणे सोबत असतो.प्रत्येक भीमसैनिक आणि त्याचे कुटुंब हे माझे स्वतःचे कुटुंब आहे.रिपब्लिकन पक्ष आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि भीमसैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे,डोंगरासारखा उभा आहे.
श्रीकांत भालेराव लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा निळ्या झेंड्याखाली जनसेवेसाठी सक्रिय होतील, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे ना.रामदास आठवले यांनी म्हटले.तर श्रीकांत भालेराव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून रुग्णालयातून काल सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे.फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी काळजी करु नये अशी माहिती सुपुत्र मंगेश भालेराव यांनी दिली.
