नाशिक दिनकर गायकवाड बसमध्ये चढताना वृद्धेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्याची घटना ठक्कर बझार बस स्थानकात घडली.
फिर्यादी शकुंतला विष्णू कोरडे (रा. श्रीरामवाडी, घोटी, ता. इगतपुरी) या दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घोटी येथे जाण्यासाठी ठक्कर बझार बस स्थानकात आल्या होत्या. कोरडे या नाशिक-इगतपुरी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची १४४ लहान मणी, दोन वाट्या, दोन ओमपान व जाळीचे सहा मणी असे एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार मुर्तरकर करीत आहेत.
