नाशिक दिनकर गायकवाड घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ११ तोळे दागिन्यांसह २५ हजार रुपये रोख चोरी करून नेल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी संतोष रतन कोळी (वय ६४) यांचा म्हसरूळ परिसरातील कलानगर येथे मधुबन नावाचा बंगला आहे. दि. १० जानेवारी रोजी दुपारी दीड ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली ३ लाख ५० हजार रुपये किमतीची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा, १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व २५ हजार रोख असा एकूण १० लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
