नाशिक दिनकर गायकवाड स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे.सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने आपले नाशिक शहर देश-विदेशातील भाविकांसमोर आदर्श ठरेल, यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त मुंबई नाका राष्ट्रीय महामार्ग परिसरात भव्य 'डीप क्लीन ड्राईव्ह' स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास नाशिक-त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह,अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, नगरसेवक सुरेशआण्णा पाटील,राजेंद्र आहेर, सागर लामखेडे, नगरसेविका सुप्रिया खोडे, प्रतिभा पवार, सीमा पवार, चित्रा तांदळे, मनपा उपआयुक्त अजित निकत, 'अविरल गोदा' चे प्रतिनिधी तसेच स्वच्छतादूत राजेश पंडित, निशिकांत पगारे, चंद्रकिशोर पाटील व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई नाका ते ट्रॅक्टर हाऊस परिसरापर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात मनपा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी-कर्मचारी, वाय एम एस एल एलपी आयइसी टीम तसेच एआयआयएलएसजी टीम यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी श्रमदान करून परिसरातील कचरा संकलन, रस्त्यांची स्वच्छता, गटारांची साफसफाई तसेच सार्वजनिक ठिकाणांची सखोल स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेदरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे ४ डंपर, ३ ट्रॅक्टर, २ जॅकब तसेच महानगरपालिकेच्या ५ घंटागाड्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला.एलईडी व्हॅनद्वारे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन,प्लास्टिकमुक्त परिसर व पर्यावरण संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली. सर्व सहभागींसाठी मास्क व हँडग्लोव्हजचे वितरण करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळण्यात आल्या. 'स्वच्छ शहर, स्वस्थ शहर स्वच्छतेचा महाकुंभ' या संकल्पनेला साकार करण्यासाठी नागरिकांनी सातत्याने सहभाग नोंदवावा, असे महापौर हिमगौरी आडके यांनी आवाहन केले.यावेळी स्वच्छ नाशिक शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी नाशिककरांना व उपस्थितांना दिली.
