श्रीरामपूर दिपक कदम शहरातील विस्थापित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी जागा मागणीचा प्रस्ताव हा यापूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेला आहे.असे असतानाही तब्बल आठ वर्षांनंतर पार पडलेल्या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभा बैठकीत केवळ ठराव मंजूर करून विषयावर समाधान मानण्यात आल्याने विस्थापित व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेत प्रशासक राज संपुष्टात येऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत विस्थापित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी हॉटेल उदय पॅलेस समोरील पाटबंधारे जागा,पुनम हॉटेल समोरील पाटबंधारे विभागाची जागा तसेच संगमनेर रस्यावरील शेती महामंडळाची जागा मागणीचा प्रस्ताव पाठवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
मात्र,हा ठराव नवीन नसून सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा मागणीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली.
या प्रस्तावाचा पाठपुरावा भाजपाचे नगरसेवक आशिष धनवटे करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, सुमारे एक वर्षापूर्वी श्रीरामपूर नगरपरिषदेने नेवासा रोड, संगमनेर रोड, गोंधवणी रोड, पोलीस ठाण्या समोरील परिसर तसेच नेहरू मार्केट समोरील तब्बल ४० वर्षांपूर्वीची छोटी-मोठी दुकाने हटवली. यामुळे अनेक छोटे व्यापारी अक्षरशः बेरोजगार झाले असून त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
विस्थापित व्यापाऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याच्या मार्गावर असून राष्ट्रीयकृत बँका व फायनान्स कंपन्यांकडून घेतलेली कर्जे फेडणे त्यांना अशक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेस पक्षाची सत्ता आल्याने विस्थापित व्यापाऱ्यांना मोठी अपेक्षा होती की पहिल्याच सर्वसाधारण बैठकीत किमान पाच फुटाच्या जागेचा ठोस पुनर्वसन प्रस्ताव मंजूर केला जाईल.
मात्र, प्रत्यक्षात तसे न घडल्याने विस्थापित व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि हवालदिल अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे “श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता येऊनही विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन होणार नाही. आम्हाला न्याय मिळणार असेल तर तो पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडूनच मिळेल,” असा ठाम विश्वास अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी व्यक्त केला.
या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनावेळी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले आंदोलनस्थळाच्या अगदी जवळून गेले, परंतु त्यांनी आंदोलकांची भेट घेतली नाही, पाठिंबा दिला नाही, तसेच आंदोलनाकडे साधी नजरही टाकली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांच्या भावना अधिक तीव्र झाल्या असून, “याची किंमत लोकप्रतिनिधींना येत्या काळात मोजावी लागेल,” अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमध्ये उमटत आहेत.या आंदोलनावेळी गौतम उपाध्ये, सुनील दंडवते रवी चव्हाण शाहरुख शेख गुलाब गायकवाड किशोर ओझा मज्जित मेमन शाहिद बागवान वसिम बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने विस्थापित व्यापारी उपस्थित होते. यावेळी आंदोलनाला नगराध्यक्ष करण ससाणे पक्ष प्रतोद वैशाली चव्हाण पक्षप्रतोद मुजफ्फर शेख नगरसेवक आशिष धनवटे दीपक चव्हाण नगरसेवक मनोज लबडे नगरसेवक संजय गांगड नगरसेवक दीपक वमने आदींनी पाठिंबा दिला
