ठाणे विशाल सावंत आजच्या आधुनिक जीवन शैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे.धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी ‘तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या महत्वपूर्ण विषयावर केले.
ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्या वतीने ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर,उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दिपक झिंजाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर,आुयक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात करण्यात आला.
आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो विद्यार्थी असो,गृहिणी असो की, नोकरदार वर्ग असो, प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचे नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.
प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येत असतात, त्यामुळे तणाव निर्माण होत असतो, दोष व्यवस्थेचा नसतो तर आपण कशा पध्दतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे, तणावमुक्ती का आवश्यक आहे.संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे यासाठी इस्कॉनने ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी भगवत गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर आहे. “आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतो; पण परिणाम आपल्या हातात नसतो. आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात, परिणामावर नियंत्रण नसते, ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे,” असे गौरांग दास यांनी नमूद केले.
जीवनातील स्पर्धा, बढती, यश-अपयश यामुळे निर्माण होणारा ताण वाढतो, अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनावर ताण वाढतो आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर होतात, असे सांगून भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सन्मान,सेवा आणि सामूहिक शक्तीचा स्वीकार हे तणावमुक्त जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. “आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे, ही जाणीव ठेवून नम्रता आणि सेवा वृत्ती स्वीकारली तर मन शांत राहते,” असे मार्गदर्शन करण्यात आले.
चिंता सोडा आणि जगायला शिका हा मंत्र दिला. बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी, आपल्या जाणीवा आणि विचारांवर आपण ताबा मिळवू शकतो असे गौरांग दास यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने इस्कॉनच्या सहकार्याने अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्यावतीने ‘तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांचा सन्मान करताना महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी.
प्रास्ताविक करताना महापालिका आयुक्त सौरभ राव.
‘तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करताना आलेल्या इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास.
