कोपरगाव दिपक कदम शहरातील शारदा शाळेच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण नाशिकमध्ये अनुभवायला मिळाला.क्रीडा व युवक संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे, नाशिक विभागीय कार्यालय नाशिक तसेच नाशिक जिल्हा ड्रॉ रोबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय ड्रॉ रोबॉल स्पर्धेत कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु.अनामिका अविनाश आहेर हिने आपल्या खेळातील कौशल्य,आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर राज्यविजेतेपदावर नाव कोरले.
या स्पर्धेत अमरावती, नागपूर,नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर आणि मुंबई अशा राज्यातील आठही विभागांतील गुणवान खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या आणि दर्जेदार सामन्यांमुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अनामिका आहेरने प्रत्येक फेरीत आपली गुणवत्ता सिद्ध करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पुणे विरुद्ध अमरावती या लढतीत अनामिकाने संयमी व आक्रमक खेळाचा सुंदर मेळ साधत ११-९ आणि ११-४ अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर उपांत्य फेरीत छत्रपती संभाजीनगर संघाविरुद्ध तिने अक्षरशः वर्चस्व गाजवत ११-० आणि ११-० असा एकतर्फी विजय नोंदवला. तिच्या खेळातील अचूकता, वेग आणि आत्मविश्वास पाहता प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.
अंतिम सामन्यात पुणे विरुद्ध नाशिक ही लढत रंगली. घरच्या मैदानाचा लाभ असतानाही नाशिक संघावर अनामिकाने दबाव कायम ठेवत ११-४ आणि ११-३ असा ठोस विजय मिळवला आणि पुणे विभागाला राज्यस्तरीय विजेतेपद मिळवून दिले. या विजयासह अनामिका आहेरने अंडर-१७ मुली गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
या यशामागे तिच्या खेळाचे प्रशिक्षक गणेश वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण सराव, योग्य तांत्रिक सूचना आणि मानसिक बळ देत प्रशिक्षक गणेश वाघ यांनी अनामिकेला घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे यावेळी आवर्जून नमूद करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांनी अनामिका आहेरचे विशेष अभिनंदन केले. तिच्या कठोर परिश्रमांचे, शिस्तबद्ध सरावाचे आणि जिद्दीचे हे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळा, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनीही तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
