अर्थ संकल्पापर्यत नाशिक मनपा कर आकारणी विभागासमोर २६४ कोटी वसुलीचे लक्ष

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास आता केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. इतक्या कमी कालावधीत महापालिकेच्या कर आकारणी विभागाला २६४ कोटींच्या करवसुलीचे लक्ष्यांक गाठायचे आहे.
आत्तापर्यंत २०६ कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे.उर्वरित ५८ कोटी वसुलीसाठी आता कर विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने मनपा प्रशासनाने कर विभागाकडून विभागनिहाय प्रत्येकी ३०० कर थकबाकीदारांच्या नावांची यादी मागविली आहे.तसेच थकबाकीदारांना पुन्हा नोटिसाही पाठविण्यात येणार आहे.

महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात दिलेले २५० कोटींचे लक्ष्यांक शंभर टक्के पूर्ण केले. तर पाणीपट्टीमध्ये मात्र मनपाला शंभर टक्के वसुली करता आलेली नाही.आता २०२५-२६ साठी मनपा आयुक्तांनी कर विभागाला २६४ कोटींचे लक्ष्यांक दिले असून, आत्तापर्यंत २०६ कोटींचा कर वसूल झाला आहे. लक्ष्यांक गाठण्यासाठी ५८ कोटी वसूल होणे बाकी असून, येत्या दोन महिन्यांत हा आकडा निश्चित करण्याकरिता आता मनपा निवडणुकीनंतर कर विभागाने नियोजन सुरू केले आहे.

मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी कर विभागाकडून विभागनिहाय ३०० थकबाकीदारांच्या नावांची यादी मागविली असून, या यादीतील बड्या थकबाकीदारांना सूचना पत्र पाठवून कर भरण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. यानंतरही कर न भरल्यास अंतिम नोटीस आणि त्यानंतर थकबाकी असलेल्या मिळकतींची लिलाव प्रक्रिया करून त्यावर मनपाचा बोजा चढविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

३४ मिळकतींवर महापालिकेने बोजा चढविला असून, त्या मिळकतींवर मनपाचे नाव इतर अधिकारात लावण्यात आले आहे.यामुळे भविष्यात संबंधित मिळकतींच्या खरेदी-विक्रीचा वा विकसित करण्याचा मुद्दा येईल तेव्हा थकबाकी भरूनच त्या मिळकतीची सुटका करून घ्यावी लागणार आहे.

सुमारे ६०० कोटी रुपये इतका घरपट्टी थकबाकीचा आकडा आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी त्यात दरवर्षी भरच पडते. दिलेल्या मुदतीत मिळकतधारकाने कर न भरल्यास त्याला दरमहा दोन टक्के शास्ती अर्थात दंड केला जातो. मात्र थकबाकी वर्षानुवर्षे भरली जात नसल्याने थकबाकी झालेल्या ६०० कोटींच्या रकमेत ४०० कोटी रुपये नुसती दंडाचीच रक्कम आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!