संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निळवंडे येथील भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय, येथे नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी बाबा खरात बोलत होते.
इतिहासातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा दाखला देत आपल्या उस्फूर्त भाषणामध्ये प्राध्यापक बाबा खरात यांनी महापुरुषांच्या कार्याचे अंतरंग उलगडले व त्यातून विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे धडे घ्यावेत याची विविध उदाहरणे दिली.यावेळी विचार मंचावर स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष पवार, सदस्य उत्तम पवार,ग्रामपंचायत सदस्य विकास पवार,बाळासाहेब पवार, रावसाहेब वारे, शशिकांत आहेर,योगशिक्षक विजय फापाळे उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचा फेटा बांधून स्वागत व सत्कार करण्यात आला त्याचबरोबर पाहुण्यांना शाळेची आठवण म्हणून एक फुलझाडाचे रोपटे भेट देण्यात आले.यावेळी प्रा बाबा खरात पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या करारी आईमुळे तर छत्रपतींसारखे रयतेचे राजे घडले.
महात्मा जोतीराव फुले - सावित्रीबाई फुलें या समाज सुधारकांनी वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून सनातनी लोकांशी संघर्ष करून बहुजनांना शिक्षण खुले करून दिले विशेषता स्त्रियांना हजारो वर्ष शिक्षणाची संधी नव्हती, त्यांना शिक्षणाची संधी महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्यामुळेच मिळाली.
त्यांच्या प्रेरणेमुळेच छत्रपती शाहू महाराजांना आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये प्रत्येक जातीसाठी विद्यालय व वस्तीगृह उभारावेसे वाटले. या शाळेत शिकून भाऊराव पाटील यांच्यासारखे द्रष्टे शिक्षण महर्षी निर्माण झाले व भाऊराव पाटलांच्या शाळेमध्येच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांसारखे हिरे निर्माण झाले.
ज्यांनी संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना,राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शिक्षण संस्था सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्था या संस्थांची स्थापना केली.या शैक्षणिक संस्थांमध्ये बहुजनांची मुले मुली शिकून अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक निर्माण झाले.
या संस्थांद्वारे संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम केला. शेतकऱ्यांना ऊस व दूध उत्पादकांना रोजगार मिळवून दिला. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एक नंबरचा तालुका म्हणून याला ओळखला जातो.या सर्व महापुरुषांकडून आलेल्या शिक्षणाच्या प्रवाहात आपण प्रत्येकाने सामील झाले पाहिजे व आपले जीवन सुंदर प्रकारे घडवून उज्वल भविष्य निर्माण केले पाहिजे.
महात्मा ज्योतीराव फुलेंपासून चालत आलेली शिक्षणाची गंगा आज निळवंडे गावापर्यंत येऊन पोहोचलेली आहे.म्हणून निळवंड्यातील प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने कठोर परिश्रम घेऊन आपल्या आई-वडिलांचे,गावाचे व समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जर प्यायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही" हा संदेश आंबेडकरांचा संदेश आपण प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. तळागाळातील कुणबी, मराठा, मागासवर्गीय तसेच आदिवासी अस्पृश्यांपर्यंत मोफत शिक्षणाचा प्रवाह नेऊन “शिका, संघटित व्हा,संघर्ष करा.” असा संदेश देणारे आंबेडकर यांचे जीवन आपण अभ्यासले पाहिजे.”
आपल्या भाषणाचा एका सुंदर देशभक्ती स्फूर्ती गीताने खणखणीत आवाजात बाबा खरात यांनी शेवट केला. त्यांच्या सुरात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सूर मिसळला व टाळ्यांच्या तालावर सुंदर असं गीत झाले
या कार्यक्रमाच्या वार्षिक अहवालाचे वाचन विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी केले.
आपल्या वार्षिक अहवालात त्यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांचा व निकालाचा आढावा घेतला.प्राचार्य माघाडे म्हणाले की,”विद्यालयाचा निकाल मागील वर्षी नव्वद टक्के लागला असून यावर्षी तो शंभर टक्के लागेल असा शिक्षकांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे.
विद्यालयामध्ये इयत्ता १० वी साठी जादा तास,सर्व वर्गांसाठी सर्व विषयांचा वाचन प्रकल्प, इयत्ता ८वीसाठी शिष्यवृत्ती एन.एम.एम.एस.साठी जादा तास,स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटी म्हणजे इंग्लिश बोलण्याचा वर्ग,अक्षर सुधार प्रकल्प, करिअर गायडन्स मार्गदर्शन वर्ग,
एक ते पंधरा जून फाउंडेशन कोर्स,वर्षभर चित्रकला, संगीत, नृत्य वर्ग,गायन प्रशिक्षण, योग एरोबिक्स, भारतीय खेळ प्रशिक्षण, क्रिकेट प्रशिक्षण,शैक्षणिक क्षेत्रभेट, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शैक्षणिक सहली, वृक्षारोपण, विविध सण-उत्सव,, महामानवाचे जयंती उत्सव, लोकजागृती फेरी ,भाषण स्पर्धा असे अनेक उपक्रम विद्यालयामार्फत आयोजित केले जातात व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले जातात.
या उपक्रमांसाठी विद्यालयाचे शिक्षक अक्षय ढोले ,श्रीराम भांगरे,माधव बढे श्रीमती सुरेखा कडाळे, शिक्षकेतर कर्मचारी राजीव साळवे व आशा जगताप यांचे नेहमी सहकार्य लाभते. त्यामुळेच आमचे विद्यालय सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांची पारितोषिके देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ढोले यांनी केले.अध्यक्षीय सूचना राजीव साळवे यांनी मांडली.या कार्यक्रमाची बक्षीस यादी वाचन श्रीराम भांगरे यांनी केले.कार्यक्रमासाठी सजावट, सुशोभन सुरेखा कडाळे व आशा जगताप यांनी केले. माधव बढे यांनी आभार मानले.
