बिळात शांत बसलेल्या नागामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण;सावधगिरीने पकडून निसर्गात सोडले.
सोनगाव,प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील धानोरे शिवालगत डाळिंब बागेत अचानक मोठ्या आकाराचा कोब्रा (नाग)आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत धाडसीपणे आणि अत्यंत सावधगिरीने नागास पकडून सुरक्षितरित्या कैद केल्याने मोठा अनर्थ टळला.
धानोरे शिवालगत येथील डाळिंब उत्पादक शेतकरी पोपट वाणी यांच्या शेतातील डाळिंब बागेच्या बांधा जवळ हा प्रकार घडला शेतात नियमित काम सुरू असताना बांधा जवळील बिळात मोठ्या आकाराचा कोब्रा शांत अवस्थेत बसलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अचानक साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थितीची गंभीरता ओळखून शेतकरी पोपट वाणी यांनी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांच्याशी तातडीने संपर्क साधला.माहिती मिळताच सर्पमित्रांने विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले आणि काळजी पूर्वक साप पकडण्याची प्रक्रिया सुरू केली.
तीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर शिवप्रसाद पवार यांनी त्या नागास अत्यंत सावधगिरीने पकडून विशेष डब्यात कैद केले. या धाडसी कामगिरीमुळे शेतकरी,मजूर तसेच आसपासच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेनंतर सर्पमित्रांनी नागरिकांना साप दिसल्यास घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. अनेक वेळा साप मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात किंवा पावसाळ्यात निवारा मिळवण्यासाठी येतात,यामुळे त्यांना इजा न करता सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
