ग्रामीण भागातून सैनिकी स्वप्नांकडे झेप

Cityline Media
0
प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

प्रवरानगर कोडीराम नेहे राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे.जिद्द, कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवत सैनिक स्कूलसाठी पात्रता मिळवली आहे.
यंदाच्या ऑल इंडिया सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत शाळेतील आदर्श उनवणे,मनिष कानडे, अनुराग डोंगरे,पवन गोरे,अथर्व गोल्हार व आदित्य वाघमारे हे सहा विद्यार्थी सैनिक स्कूलसाठी पात्र ठरले आहेत.ग्रामीण भागातील मर्यादित साधन सामग्री असूनही विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या जिद्दीचा व गुणवत्तेचा प्रत्यय दिला आहे, त्यांच्या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. 

सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नामदेव फटांगरे तसेच श्रीम. मनिषा गावडे, श्रीम. मनिषा सपकाळे व महादेव कानडे या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विशेषतःपरीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनी १५ मे पासून वर्षभर सुट्टी न घेता सातत्याने भरपूर सराव चाचण्या, अतिरिक्त वर्ग घेऊन, क्यू आर कोड  गुणवत्ता उपक्रम राबवून आणि वैयक्तिक मार्गदर्शन करून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली आहे, यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.

शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विशेष अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे जिल्हा परिषद मार्फत राबविला जाणाऱ्या मिशन आरंभ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या नियमित सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री नामदार डॉ.  राधाकृष्ण विखे तसेच मा.जि.प.अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे विशेष कौतुक केले आहे.

या यशामध्ये राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांचे प्रेरणादायी प्रोत्साहन, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मोलाचे ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेत सध्या आनंदाचे वातावरण असून हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!