लोणी रुपाली भालेराव भगवान महावीर जन्मकल्याणक या पावन पर्वाचे औचित्य साधून जैन श्रावक संघ, लोणी यांच्या वतीने 'एक शाम प्रभू महावीर के नाम' या संकल्पनेवर आधारित एका भव्य 'भक्ती संध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकल जैन समाजाच्या पुढाकाराने आयोजित हा कार्यक्रम येत्या ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सुरभी मंगल कार्यालय, म्हसोबा मंदिर समोर या ठिकाणी हा भक्तिमय सोहळा पार पडणार असून यानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या मंगलमयी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक आणि कलाकारांच्या सुरावटींनी प्रभू महावीरांची आराधना केली जाणार आहे.यामध्ये 'तपस्वी स्वर' पुरस्कृत प्रसिद्ध गायक दीपक संचेती आणि धीरज दुग्गड यांच्यासह कल्पेश गोलेच्छा आपल्या भक्तीगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील.या कलाकारांना 'अनुमोदना ग्रुप'ची साथ लाभणार असून भक्तीची ही गुंज प्रत्येक भक्ताच्या मनात प्रभू महावीरांप्रती असलेली श्रद्धा अधिक दृढ करेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत होणारा हा भावसंगीत सोहळा भक्तांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
या भव्य भक्ती संध्या कार्यक्रमाला सकल जैन समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन श्रावक संघ, लोणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.भगवान महावीरांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील एकोपा आणि धार्मिक चैतन्य वृद्धिंगत होणार आहे.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून,लोणी व परिसरातील धर्मप्रेमी जनतेमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
