श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूरचा भुमिपुत्र असलेले रोहित नरेश सांगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत ऑल इंडिया रॅंकमध्ये ८६५ वा क्रमांक पटकावून यश प्राप्त केले.
रोहित सांगळे यांचे वडील श्रीरामपूर नगर परिषदेत सफाई कामगार पदी नोकरी करत असून त्यांच्या आई एक छोटेसे टपरीवजा किराणा दुकान चालवतात ,आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन रोहितने अतिशय मेहनतीने, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे अभूतपूर्व यश संपादन केले आणि यशाचं हे उत्तुंग शिखर गाठणारा तो मेहतर समाजातील २०२५ च्या बॅचचा संपूर्ण भारतात एकमेव विद्यार्थी ठरला.
या आधी देखील रोहित यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन युपिएससी च्या अंतर्गत ईपीएफओ या केंद्रीय पदावर ते सध्या कार्यरत आहेत मात्र त्याचवेळी त्यांनी या यशावर समाधान न मानता पुढील ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने स्व अध्ययन करत राहिले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
रोहित सांगळे यांच्या पत्नी देखील केंद्रीय निती आयोग कार्यालय दिल्ली येथे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ,तसेच त्यांच्या भगिनी या श्रीरामपूर नगर परिषदेच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यभार सांभाळत आहेत,या वेळी आमदार हेमंत ओगले यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की आम्हा सर्व श्रीरामपूरकरा करिता रोहित सांगळे यांचे यश अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिस्थिती मग ती गरिबी असो अथवा श्रीमंती ती कधीच आड येत नाही.ध्येय एकदा निश्चित झालं की ध्येयपूर्तीसाठी झपाटून काम करणे,अभ्यास करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून हे आज आपल्या रोहितने त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सत्कार करतांना श्रीरामपूर नगर परिषदेच्या सर्व अधिकारी,कर्मचारी, सफाई कामगार यांच्या पाल्यांनी रोहित सांगळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन,साचेबद्ध ,पारंपरिक नोकरी,व्यवसायाच्या मागे न लागता,भविष्यात मोठि स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवापाड मेहनत करून देशपातळीवर आपले गाव,आई वडिल,यांच नाव उंचावले पाहिजे अशी भावना व्यक्त केली,
रोहित सांगळे हे त्यांच्या प्रशासकीय कामकाजातून एक आदर्श निर्माण करतील व त्यांना प्रेरणास्रोत मानून असे अनेक अधिकारी श्रीरामपूरच्या मातीतून घडतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेस पक्षाच्या सौ दीपाली ससाणे,नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण,दिपक चव्हाण खादी ग्रामोद्योग संघाचे उपाध्यक्ष दीपक चव्हाण, कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश बिंगळे, डॉ रविना सांगळे, सुधीर वायखिंडे सुनील जेधे, नरेश सांगळे,सौ सांगळे ई पदाधिकारी उपस्थित होते सत्कारमूर्ती रोहित सांगळे यांनी सर्वांचे आभार मानले.
