हनुमंतगाव संदिप गावडे राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त ब्रम्हलीन सदगुरू नारायणगिरी महाराज व मणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ग्रामदैवत हनुमंतराय यांचा अखंड हरिनाम सप्ताह आज गुरुवार दि. २६ मार्च पासून सुरू होत आहे.
सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण आहे. सप्ताहनिमीत्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकीत किर्तनकारांचा किर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या सप्ताहनिमित्त पहाटे काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,संत तुकाराम गाथा भजन,सायंकाळी ५ वाजता हरिपाठ,अखंड विना वादन, कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.
गुरुवार दि २६ रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प.दत्तगिरी महाराज उंबरेश्वर, वंरवडी देवस्थान यांचे हस्ते ध्वजारोहण होणार असून रोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत कीर्तन महोत्सव होणार आहे.
या कीर्तन महोत्सवामध्ये मुक्ता महाराज दिघे,अनिता जाधव,ज्योती महाराज पवार,श्रीगणेश महाराज वाघमारे,उत्तम महाराज गाढे,रोहीणी राऊत ,बाबानंद वीर महाराज यांचे किर्तन होईल.
३ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ह.भ.प.भागवत महाराज सातभाये संस्थापक अध्यक्ष जगदंबा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यांना ज्ञानराज माऊली सेवा भावी संस्था आश्वी खुर्द येथील वारकरी संस्थेतील मुले, गायनाचार्य, बाल मृदुगांचार्य व हनुमान भजनी मंडळ, संत सावता महाराज भजनी मंडळ यांची साथ असेल.
गुरुवार दि २ रोजी सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाची भव्य मिरवणूक त्यानंतर ह.भ.प.वीर बाबानंद महाराज व लोणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते दिपवंदनाचा कार्यक्रम होईल.
हा सप्ताह पंचक्रोशीत प्रसिद्ध असून अनेक दानशूर भाविक तसेच अन्नदाते यांचे सप्ताहामध्ये मोठे योगदान देत असतात. दररोज सायंकाळी अनेक महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन केले आहे.
शुक्रवार दि ३ रोजी काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसादाचे वाटप होईल. या कीर्तन महोत्सवास परीसरातील भाविकांनी उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सप्ताह आयोजन कमिटी, हनुमान भजनी मंडळ,संत सावता भजनी मंडळ,स्वामी समर्थ ग्रुप,युवा मंच,ज्ञानदिप वाचनालय,सावता महाराज मित्रमंडळ व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
